बीड: संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या, दररोज समोर येणारे अमानुष मारहाणीचे व्हिडिओ, गुन्हेगारांची दहशत यामुळेच बीड जिल्हा गेल्या तीन महिन्यांपासून चर्चेत आहे. बीडमधील या क्रुर घटनांच्या मालिकांनी राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. अशातच बँकेच्या प्रांगणात गळफास घेऊन शिक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील केज येथे बँकेच्या प्रांगणात एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केजमधील स्वराजनगर भागातील कृष्ण अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेजवळ हा प्रकार घडला. धनंजय अभिमान नागरगोजे असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते केळगाव येथील आश्रम शाळेमध्ये शिक्षक होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
धक्कादायक बाब म्हणजे, आत्महत्येआधी त्यांनी फेसबुकवर पोस्ट केली. ज्यामध्ये त्यांनी आपल्या मुलीची माफी मागितली तसेच सहा जणांची नावेही त्यामध्ये लिहली आहेत. अनेक वर्षांपासून पगार न झाल्याने आणि वरिष्ठांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. या घटनेने बीड पुन्हा हादरुन गेले आहे.
शेवटची पोस्ट जशीच्या तशी..
श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर. मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही बाळा तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिली होती पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागले. काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही .कधी मी कुणाला दोन रूपयाला फसवल नाही किंवा कुणाचं कर्ज पण घेतल नाही. श्रावणी बाळा शक्य झालंच तर कर एकदा तुझ्या बापूला माफ कारण तुला मी एकट्याला सोडून जात आहे.
तुला अजून काही कळत नाही तुझ वय आहेच किती, तीन वर्षे तुला काय कळणार ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळला नाही.बाळा बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही, सर्वांसोबत चांगला वागला, पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला आहे. विक्रम बाबुराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, अतूल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड, ज्ञानेश्र्वर रजेभाऊ मुरकुटे या सर्वांनी माझा खूप छळ लावला आहे .मला हे हाल हाल करून मारणार आहेत.
ट्रेंडिंग बातमी - Vasai News: होळी दहन करून घरी येत असताना मामा भाच्यावर काळाचा घाला
मला मारण्याचं कारणं म्हणजे मी फक्त विचारलं होत की, मी तुमच्या शाळेवर गेली 18 वर्षे झालं काम करतोय. अजून मला पगार नाही आता पुढे काय करायचं? त्यावर विक्रम बप्पा म्हणाले 'तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा', हे एकूण माझ्या पायाखालची जमीनच सरकली तीतून पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सूर्वात केली.
श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत या राक्षसा मुळेच मी तुझ्या पासून दूर जात आहे. तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलो. काय करू माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकांनी ठेवला नाही. बाळा डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पण त्याग केल्याशिवाय पर्याय नाही. मी थांबतो खूप त्रास होतोय मला. हे सर्व मझ्या माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत .कारण यांनी मला खूप त्रास दिला आहे यांच्या मुळेच मी माझे जीवन संपवत आहे, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.