- संतोष देशमुख हत्येचा आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे
- धनंजय देशमुख यांनी आरोप केला की कृष्णा आंधळे तीन वेळा त्यांच्या गावात आला होता
- आरोपीकडे मोबाईल नसल्यामुळे तपासात अडचणी येत आहे
आकाश सावंत
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला वर्ष उलटून गेले. तरी या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. पण त्याचा काही एक पत्ता लागलेला नाही. त्यामुळे पोलीसांच्या तपास यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तर दुसरीकडे या हत्येचा खटला ही संथगतीने सुरू आहे. त्यामुळे देशमुख कुटुंबीय अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. या दरम्यान आता संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी एक धक्कादायक आणि पोलीसांची झोप उडवणारा खुलासा केला आहे. त्यांच्या या खुलाशामुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरच शंका उपस्थित झाली आहे. हा खुलासा पोलीसांच्या पायाखालची वाळू सरकवणाराच म्हटला आहे.
धनंजय देशमुख यांनी दावा केला आहे की, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरारी आरोपी कृष्णा आंधळे त्याच्या गावी येवून गेला. तो एक वेळा नाही तर चक्क तीन वेळा त्याच्या गावात येवून गेला आहे असा आरोप धनंजय यांनी केला आहे. गेल्या सहा महिन्यांत मिळालेली माहिती आम्ही सीआयडी कार्यालयाला दिली आहे. ती माहिती खरी असल्याचं सीआयडी कार्यालयाकडून मान्य देखील करण्यात आला आहे अशी माहिती ही धनंजय देशमुख यांनी दिली. मात्र तपासात मोठी अडचण म्हणजे आरोपीकडे कोणताही मोबाईल नसल्यामुळे त्याचा तपास करणे कठीण जात आहे असं ही त्यांनी सांगितलं.
धनंजय देशमुख यांनी पुढे सांगितले की या आरोपीमुळे आमच्या कुटुंबीयांच्या जीवितास धोका आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या आरोपीला लवकरात लवकर पकडून त्याची जिल्ह्यात धिंड काढून त्याला जेरबंद करावे अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे. पण यातून काही प्रश्न ही निर्माण होत आहे. देशमुख यांनी दिलेल्या माहिती नुसार सीआयडी ती माहित खरं आहे असं सांगत आहे तर सीआयडीने सापळा का रचला नाही. त्याच्यावर पाळत का ठेवली नाही असा ही प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे.
दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी 6 मार्च रोजी होणार आहे. ही सुनावणी ही अतिशय संथगतीने सुरू आहे. आजच्या सुनावणीत आरोपी पक्षाला सर्व कागदपत्राची पूर्तता करा अशी कोर्टाने सरकारी पक्षाला सूचना देण्यात आली. आरोपी क्रमांक तीन ते सात यांनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम बदलण्यात यावे यासाठी केलेल्या अर्जावर सरकारी पक्षाकडून लेखी म्हणणे सादर केले जाणार आहे. विष्णू चाटेच्या जेल बदलीच्या अर्जावर आज ऑर्डर येण्याची ही शक्यता आहे.
आरोपी जयराम चाटे कडून वकील बदलला आहे. नवीन वकील एम के वाघीरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोर्टाकडून प्रतीक घुलेला विचारणा करण्यात आली की वकील लावायचा आहे का? त्यावर प्रतीक घुले कडून उत्तर दहा पंधरा दिवसात घरचे लोक वकील बघत आहेत असे त्याने सांगितले. दरम्यान लॅपटॉपची क्लोन कॉफी मिळाली नाही, फॉरेन्सिकचा रिपोर्टही मिळाला नाही, पेन ड्राईव्ह मिळाला नाही. या सर्व गोष्टीची पूर्तता झाल्याशिवाय साक्षीदारांची लिस्ट स्वीकारू नये अशी आरोपींच्या वकिलांची कोर्टाकडे विनंती केली आहे. सरकारी पक्षाकडून एवढी घाई का केली जात आहे. सरकारी पक्षाला दोषारोप पत्र एकदाच पूर्ण दाखल करायला सांगा असं आरोपी वाल्मीक कराडचे वकील विकास खाडे यांनी मागणी केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world