आकाश सावंत, प्रतिनिधी
Santosh Deshmukh Murder Case Update: संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या बीड जिल्ह्यातल्या मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता एक मोठी खळबळजनक अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड यांचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर, त्यांच्या मुलाने सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार, असा सूचक इशारा वाल्मीक कराड यांचा मुलगा सुशील कराड याने दिला असून, या इशाऱ्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
फेसबुक पोस्ट आणि चर्चेला उधाण
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता 1 वर्ष पूर्ण झाले आहे. या प्रकरणात वाल्मीक कराड यांच्यासह 7 आरोपी सध्या तुरुंगात आहेत. बीडच्या विशेष मकोका न्यायालयात या प्रकरणाचा खटला सुरू आहे. दरम्यान, यातील एक आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. अशातच सर्वोच्च न्यायालयाने वाल्मीक कराड यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आणि पुढील 1 वर्ष जामीन अर्ज दाखल करता येणार नसल्याचे स्पष्ट केले.
( नक्की वाचा : Dombivli News: माझ्या खात्यात 2 कोटी 60 लाख आले कुठून? तरुणीच्या प्रश्नानं डोंबिवलीत खळबळ, वाचा काय आहे प्रकरण )
या निकालानंतर लगेचच सुशील कराड यांनी फेसबुकवर सूचक पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे सुशील कराड नक्की कोणाचे पितळ उघडे पाडणार आणि कोणाकडे त्यांचा रोख आहे, अशा चर्चांना उधाण आले आहे.

धनंजय देशमुख आक्रमक
सुशील कराड यांच्या या पोस्टनंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर अशा पोस्ट टाकण्यापेक्षा समोर या आणि काय सत्य आहे ते सांगा, असे आव्हान त्यांनी दिले आहे.
तुम्हाला कुणाच्या आश्रयानं ही हिंमत आली आणि ही ताकद नक्की कोणाची आहे, असा थेट सवाल धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला आहे. केवळ जामीन मिळेल या आशेवर मिरवणुकीचे स्वप्न पाहिले जात होते, असा टोला लगावत त्यांनी सुशील कराड यांच्या भूमिकेचा जोरदार समाचार घेतला आहे.
( नक्की वाचा : Chhagan Bhujbal : पार्थिव समोर होतं आणि तुम्ही विलीनीकरण मागत होता?'; भुजबळांचा सवाल, NCP च्या बैठकीत सन्नाटा )
धनंजय देशमुख यांनी पुढे बोलताना गंभीर आरोप केला आहे. सुशील कराड यांची ही भाषा म्हणजे केवळ तक्रारदाराला नाही, तर थेट न्यायालय, शासन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रशासनालाही चॅलेंज देण्यासारखी आहे, असे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणातील संवेदनशील परिस्थिती पाहता, सुशील कराड खरंच समोर येऊन काही धक्कादायक खुलासा करणार का आणि या खुलाशामुळे प्रकरणाला कोणते नवीन वळण मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world