जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. एका तरुणीने छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना 14 मार्चला घडली आहे. साक्षी कांबळे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. 14 मार्चला धाराशिव इथं मामाच्या घरात गळफास घेत तिने टोकाचं पाऊल उचललं होतं. तिचं एप्रिल महिन्यात लग्न ही होणार होतं. तिच्या आत्महत्येला एक महिना उलटून गेला असून कुटुंब अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यात आता साक्षीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी आपण तुमची लाडकी बहीण असून भावाकडे त्यांना मदत मागितली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात साक्षी कांबळे यांच्या आई म्हणतात, साहेब, मी तुमची लाडकी बहीण आहे. तुम्ही मुख्यमंत्री झाला आणि राज्यातील अस्वस्थ झालेल्या बहिणींना आधार मिळाला. आपण मुख्यमंत्री असताना आपल्या म्हणजेच आम्हासारख्या अगणित बहिणींना भावाचा बंध मिळाला. मी नाराज आहे. आज आपण उपमुख्यमंत्री आहात. मात्र माझ्यासाठी तुम्हीच लाडक्या बहिणीचे मुख्यमंत्री आहात. आज आम्हाला तुमची कमतरता भासते, असे त्यांनी सुरुवातीला म्हटले आहे.
पुढे त्या म्हणतात, माझी मुलगी साक्षी तिला हवाई सुंदरी व्हायचे होते. मात्र एका क्षणात ती नाहीशी झाली. काही मुलांनी तिची छेड काढली आणि साहेब तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेऊन जीवन संपवले. साहेब आम्ही आस धरुन आहोत. तुमची भाची साक्षी या जगात परत येणार नाही, हे आम्हाला देखील माहिती आहे. मात्र त्या क्रूर नराधमांना देखील तेवढी शिक्षा होणे अपेक्षित आहे. असं म्हणत त्यांनी साक्षीच्या गुन्हेगारांना तातडीने शिक्षा झाली पाहीजे अशी मागणी या पत्राच्या माध्यमातून केली आहे.
साक्षी ही बीड जिल्ह्यातील केएसके महाविद्यालयात शिक्षणत होती. तिने 14 मार्चला धाराशिव येथे मामाच्या घरी गळफास घेत आपले जिवन संपवले होते. याला आता एक महिना झाला आहे. असं असताना साक्षीला ज्यांच्या मुळे हे पाऊल उचलावे लागले ते आरोपी मात्र अजून ही मोकाट आहेत. पीडित कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. साक्षी कांबळे या तरुणीची अभिषेक कदम हा छेड काढत होता, असा आरोप आहे. शिवाय तिला ब्लॅकमेल केलं जात होतं. या त्रासाला कंटाळून तिने गळफास घेतला. 20 एप्रिलला तिचे लग्न होणार होते.