परळी तालुक्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यात आता आणखी एका सराईत गुन्हेगाराचा दहशत माजवणारा व्हिडिओ समोर आला आहे. गोट्या गित्ते ऊर्फ ज्ञानोबा मारुती गीते या गुन्हेगाराचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल झाले आहेत. त्यामुळे पोलिस यंत्रणेसमोर पुन्हा एकदा मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. हा व्हिडीओ गोट्या गित्तेचा आहे. तो वाल्मिक कराडच्या जवळचा समजला जातो. एका व्हिडिओमध्ये गोट्या गित्ते रात्रीच्या अंधारात "राम नाम सत्य है" असे म्हणत एका घरासमोर नैवेद्य ठेवताना दिसत आहे. यानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो हातात बंदूक घेऊन ‘स्टाईलमध्ये' रील शूट करताना स्पष्टपणे दिसत आहे. दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरले असून नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे. गोट्यानं असं केलं म्हणजे मर्डर फिक्स अशी ही चर्चा सुरू झाली आहे.
गोट्या गित्तेवर याआधीच एका खून प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई झाली आहे. तो सध्या फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत असताना हा नवीन व्हिडिओ समोर आला आहे. त्यात तो बिनधास्त पणे वावरत आहे. रिल्स बनवत आहे असं दिसतय. गोट्या गित्ते परळी तालुक्यातील नंदागौळ गावचा रहिवासी आहे. गेल्या 15 वर्षांपासून त्याच्यावर बीड, परभणी, लातूर, पिंपरी-चिंचवडसह विविध भागांतील पोलिस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तो संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडचा विश्वासू सहकारी आहे. शिवाय तो वाल्मिकचा ‘राईट हँड' मानला जातो. विशेष म्हणजे, गोट्या गित्तेचे नेटवर्क केवळ बीड किंवा मराठवाड्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले असल्याची माहिती समोर आली आहे.
गोट्याच्या माध्यमातून अनेक गुन्हेगारी टोळ्यांना बंदुका पुरवल्या जात असल्याचा संशयही व्यक्त होत आहे. बीड परिसरात अनेक गुन्हेगारांच्या कमरेला दिसणाऱ्या बंदूकां मागचा स्रोत गोट्या गित्तेच असल्याचेही बोलले जात आहे. परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्याप्रकरणात गेल्या काही दिवसांपासून गंभीर आरोप करण्यात येत आहेत. संतोष देशमुख प्रकरणातील प्रमुख सुत्रधार वाल्मिक कराडच्या रक्ताच्या व्यक्तींसह काही जणांनी महादेव मुंडे यांची हत्या केल्याचा आरोप वाल्मिक कराडच्या निकटवर्तीय बाळा बांगरने केला होता.
या प्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलाचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. श्री आणि सुशील कराड ही दोन वाल्मीक कराडची मुलं आहेत. त्याचबरोबर गोट्या गित्ते यांच्यासह आणखी काही जणांनी महादेव मुंडेंना वाईट पद्धतीने मारलं असा आरोप होत आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये महादेव मुंडे यांचा खून कसा झाला हे देखील समोर आलं आहे. कराडचे जुने सहकारी असलेले बाळा बांगर आता या प्रकरणाबाबत माहिती समोर आणत आहेत. त्यांनी काही गंभीर आरोपही केले आहेत.