आकाश सावंत, प्रतिनिधी
Beed News : बीड जिल्ह्यातील पाटोदा ते मांजरसुंबा रोडवर असलेल्या वैद्यकिन्ही टोल नाक्यावर दहशतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. सोमवारी रात्री या टोल नाक्यावर एकाच कुटुंबातील तीन सदस्यांना 20 ते 25 जणांच्या टोळक्याने लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने अत्यंत क्रूरपणे मारहाण केली.
या हल्ल्यात बहीण, भाऊ आणि त्यांचा भाचा गंभीर जखमी झाले असून त्यांच्या अंगावर अनेक जखमा झाल्या आहेत. रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या या जखमींना तातडीने बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून टोल नाक्यावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांवर गंभीर आरोप
या घटनेनंतर पीडित कुटुंबाने तातडीने पाटोदा पोलिसांशी संपर्क साधून तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी ही तक्रार घेण्यास जाणीवपूर्वक विलंब केल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. मारहाण करणारे आरोपी हे राजकीय वरदहस्त असलेले लोक असून त्यांच्या दबावाखाली येऊनच पोलिसांनी सुरुवातीला मदत करण्यास नकार दिल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. कोणाच्या तरी सांगण्यावरून पोलीस या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचे पाहून नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.
(नक्की वाचा : Solapur News : सोलापुरात रक्ताचा सडा! महानगरपालिका निवडणुकीतील इच्छुक उमेदवाराची हत्या )
पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकला मोर्चा
आरोपींना तात्काळ अटक करावी आणि त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आणि आपली व्यथा मांडली.
मारहाण करणारे आरोपी हे यापूर्वीच्या एका खून प्रकरणातील संशयित असून त्यांना मोकाट सोडणे धोक्याचे असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. जर पोलिसांनी या प्रकरणात लवकर पावले उचलली नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
टोल नाक्यावरील मारहाणीचा जुना व्हिडिओ समोर
वैद्यकिन्ही टोल नाक्यावर मारहाण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील अनेक प्रवाशांना आणि तरुणांना इथे अशाच प्रकारे मारहाण झाल्याचे समोर आले आहे. यापूर्वी झालेल्या एका मारहाणीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात मोठ्या प्रमाणात तरुणांना जमा करून लोकांवर हल्ले केले जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. रात्रीच्या वेळी देखील याच पद्धतीने दबा धरून बसलेल्या टोळक्याने या कुटुंबावर हल्ला केल्याचा आरोप किरण बांगर आणि शिवराज बांगर यांनी केला आहे.