Triple Murder: आधी आईला संपवून रक्ताचे डाग धुतले, मग बहीण-वडिलांची वाट पाहिली; पोटच्या मुलीचे धक्कादायक कृत्य

Bengaluru Triple Murder: एकाच कुटुंबातील 3 जणांची धारदार शस्त्राने वार करून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Bengaluru Triple Murder: हे संपूर्ण हत्याकांड पूर्वनियोजित होते का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
मुंबई:

Bengaluru Triple Murder: एकाच कुटुंबातील 3 जणांची धारदार शस्त्राने वार करून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळबळ उडाली असून हत्येचे कारण आणि पद्धत ऐकून पोलीसही चक्रावून गेले आहेत. आई, वडील आणि लहान बहिणीची घरातच रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह आढळून आले आहेत. हे हत्याकांड दुसऱ्या कोणी नाही, तर त्याच घरातील मोठ्या मुलीने तिच्या प्रियकरासोबत मिळून केल्याचा संशय पोलिसांना आहे.

काय आहे प्रकरण?

कर्नाटकची राजधानी बेंगळुरुमधील हा सर्व धक्कादायक प्रकार आहे. या घटनेतील मृतांची नावे सोमसुंदर (वय 55), त्यांची पत्नी मुथुलक्ष्मी (वय 48) आणि त्यांची लहान मुलगी सुप्रिया (वय 20) अशी आहे. ही धक्कादायक घटना सोमवारी घडली असून या प्रकरणी मोठी मुलगी श्वेता आणि तिचा लिव्ह-इन पार्टनर केनेथ यांच्यावर संशयाची सुई आहे. हे दोघेही सध्या फरार आहेत.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, श्वेता आणि केनेथ यांच्यात प्रेमसंबंध होते आणि ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, श्वेताच्या घरच्यांचा या संबंधांना तीव्र विरोध होता. याच विरोधामधून हे टोकाचे पाऊल उचलले गेले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. हे संपूर्ण हत्याकांड पूर्वनियोजित होते का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

( नक्की वाचा : Kalyan News: 3 मृत व्यक्तींना जिवंत दाखवून कोट्यवधींची जमीन हडपली? कल्याणमधील बड्या नेत्यावर गुन्हा )
 

कर्जाचा मोठा डोंगर

या प्रकरणाच्या तपासातून आता काही धक्कादायक माहिती समोर येत आहे. मोठी मुलगी श्वेता हिच्यावर तब्बल 30 लाख रुपयांचे कर्ज झाले होते. या कर्जावरून तिचे आई-वडील तिला सतत विचारणा करत असत. पैशांच्या या वादामुळे आणि कर्जाच्या वाढत्या डोंगरामुळे घरात वारंवार भांडणे होत होती आणि कुटुंबात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

कशी केली हत्या?

सोमवारी श्वेता आणि तिचा प्रियकर केनेथ हे दोघे घरी आले. त्यावेळी घरात फक्त तिची आई मुथुलक्ष्मी एकटीच होती. तिचे वडील आणि लहान बहीण काही कामानिमित्त बाहेर गेले होते. घरात आल्यानंतर श्वेता, केनेथ आणि आई यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद इतका वाढला की त्यांनी मुथुलक्ष्मी यांच्यावर सत्तूरसारख्या धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी बाथरूममध्ये रक्ताचे डाग धुवून काढले.

( नक्की वाचा : धक्कादायक! 'आय लव्ह यू मम्मी, पप्पा...' लिहून 12 वी तील टॉपर मुलीनं संपवले आयुष्य, कारण काय? )

आईची हत्या केल्यानंतर श्वेता आणि केनेथ हे दोघे वडील आणि लहान बहीण येण्याची वाट पाहत घरातच थांबले. काही वेळाने लहान बहीण सुप्रिया जेव्हा घरात आली, तेव्हा श्वेताने तिला घट्ट पकडून ठेवले आणि केनेथने तिच्यावर शस्त्राने वार करून तिला जागेवरच संपवले. त्यानंतर वडील सोमसुंदर घरात आले. त्यांच्यावरही या दोघांनी तसाच हल्ला केला. सोमसुंदर हे गंभीर जखमी अवस्थेत जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पळाले आणि त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला, मात्र गंभीर जखमांमुळे नंतर त्यांचा मृत्यू झाला.


हा सर्व थरार साई ग्रीन अपार्टमेंट, धमानिक लेआउट, सीगेहल्ली परिसरात घडला असून हे ठिकाण केआर पुरम पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. केआर पुरम पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ईस्ट पॉईंट रुग्णालयात पाठवले आहेत. या दुहेरी हत्येच्या घटनेनंतर आरोपी श्वेता आणि केनेथ फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे, मात्र त्याची माहिती अद्याप उघड केलेली नाही.
 

Advertisement