जाहिरात

Kalyan News: 3 मृत व्यक्तींना जिवंत दाखवून कोट्यवधींची जमीन हडपली? कल्याणमधील बड्या नेत्यावर गुन्हा

Kalyan News : या प्रकरणात 3 मृत व्यक्तींना चक्क जिवंत दाखवून, कोट्यवधी रुपयांची जमीन हडप केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. 

Kalyan News: 3 मृत व्यक्तींना जिवंत दाखवून कोट्यवधींची जमीन हडपली? कल्याणमधील बड्या नेत्यावर गुन्हा
Kalyan News: या प्रकरणात 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण:

Kalyan News: कल्याण पश्चिमेतील उंबर्डे गावात तब्बल 126 गुंठे जमिनीच्या खरेदीखतात मोठा गैरव्यवहार झाल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या हायप्रोफाइल प्रकरणाने कल्याणच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणात 3 मृत व्यक्तींना चक्क जिवंत दाखवून, त्यांच्या बनावट सह्या आणि खोट्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे कोट्यवधी रुपयांची जमीन हडप केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. 

या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी शिंदे गटाचे माजी नगरसेवक, उपशहर प्रमुख सुनील वायले, त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि विकासकांसह 7 जणांविरोधात फसवणूक तसेच ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवली आहेत.

काय आहे प्रकरण?

हा संपूर्ण वाद उंबर्डे गावातील सर्वे क्रमांक 80 मधील वडिलोपार्जित जमिनीशी संबंधित आहे. भीमनगर भागात राहणारे प्रमोद विश्वनाथ गायकवाड यांनी या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दिली आहे. 

या प्रकरणात करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, जमीन व्यवहाराशी संबंधित असलेले जयंतीलाल भोईर, रतन भोईर आणि सुमन भोईर या तिन्ही व्यक्तींचे निधन झालेले असतानाही, ते जिवंत असल्याचे भासवणारे बनावट प्रतिज्ञापत्र दुय्यम निबंधक कार्यालयात सादर करण्यात आले. इतकेच नव्हे तर 8 मार्च 2022 रोजी या मृत व्यक्तींच्या नावावर खोट्या सह्या करून जमिनीचे बेकायदेशीर खरेदीखत नोंदवून घेण्यात आले.


( नक्की वाचा : Dombivli News: राज ठाकरे आणि मराठी माणसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, डोंबिवलीत मनसे आक्रमक; शहरात तणाव )

या जमीन घोटाळ्याप्रकरणी तक्रारदाराने सत्ताधारी पक्षाच्या प्रभावाचा गैरवापर करून महसूल यंत्रणेशी संगनमत केल्याचा आरोप केला आहे. तसेच जमिनीचा हा वाद मागे घेण्यासाठी गायकवाड कुटुंबाला धमकावण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या गंभीर आरोपांनंतर पोलिसांनी माजी नगरसेवक सुनील राजाराम वायले, निर्मला वायले, अलका वायले, किसान वायले यांच्यासह विकासक शिरीष दळवी, सुनील हरिचंदानी आणि जितू लालचंदानी अशा 7 जणांवर भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल केला आहे.

माजी नगरसेवकांचा प्रतिआरोप

दुसऱ्या बाजूला, माजी नगरसेवक सुनील वायले यांनी आपल्यावरील सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. तक्रारदार गायकवाड कुटुंबाशी आपला कोणताही थेट संबंध किंवा व्यवहार झालेला नाही, असा दावा त्यांनी केला आहे. हा जमीन व्यवहार मूळ मालक आणि विकासक यांच्यात झाला असून त्यासाठीची आवश्यक अधिकारपत्रे पूर्णपणे वैध होती, असे त्यांनी स्पष्ट केले.

केवळ राजकीय दबाव आणण्यासाठी आणि आर्थिक फायदा उकळण्यासाठी ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करून आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला यात जाणीवपूर्वक गोवण्यात आले असून, या अन्यायाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे सुनील वायले यांनी सांगितले आहे.

( नक्की वाचा : Sanjay Raut: संजय राऊतांच्या 'ऑपरेशन तुडवा'ला शिंदेच्या शिलेदाराचे आव्हान; सुरक्षेसाठी शिवसैनिक बनणार ढाल )

पोलीस तपासातूनच सत्य बाहेर येणार

एकीकडे मृत व्यक्तींच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करून हक्काची जमीन हडपल्याचा पीडित कुटुंबाचा आक्रोश आहे, तर दुसरीकडे राजकीय सूडबुद्धीने गुन्हा दाखल केल्याचा प्रतिआरोप होत आहे. या आरोप-प्रत्यारोपांमुळे उंबर्डे येथील हा जमीन वाद आता कल्याणमध्ये चांगलाच पेटला आहे. या प्रकरणामागील खरे सत्य काय आहे, कागदपत्रांमध्ये खरोखरच फेरफार झाला आहे का, याचा उलगडा आता खडकपाडा पोलिसांच्या सखोल तपासातूनच समोर येणार आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com