3 नोव्हेंबर रोजी देशभरात भाऊबीजेचा (Bhai Dooj) सण उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी बहीण ही भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मात्र याच दिवशी वरोरा तालुक्यातील एका बहिणीला भावाची सोबत गमवावी लागली आहे. हा भाऊ भाऊबीजेसाठी बहिणीकडे जात असताना हा धक्कादायक प्रकार समोर आला. वरोरा तालुक्यातील पोंभुर्णा तालुक्यात ही घटना घडली. भाऊबीजेच्या दिवशीच भावाच्या प्रेमाला बहीण पोरकी झाली.
भाऊबीजेसाठी जात असलेल्या भावाचा पोंभुर्णा तालुक्यात अपघात झाला. गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. भाऊबीजेच्या दिवशीच भावाच्या प्रेमाला बहीण पोरकी झाली. या अपघातात अक्षय निलकंठ वाढई (25) नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. तो वरोरा तालुक्यातील डोंगरगाव येथून चेक आष्टा गावाकडे येत होता. मिळालेल्या माहितीनुसार, पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा येथील अक्षय निलकंठ वाढई हा वरोरा तालुक्यातील डोंगरगाव येथे खाजगी कंपनीत काम करत होता. भाऊबीजेसाठी अक्षय दुचाकीने चेक आष्टा गावाच्या दिशेने निघाला होता. डोंगर हळदी गावानजीक असलेल्या वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्याचा अपघात झाला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी पोंभूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
नक्की वाचा - महाराष्ट्रासह 'भाऊबीज' सण विविध राज्यांमध्ये या नावांनी केला जातो साजरा
निलकंठ याला सख्खी बहीण नाही. मात्र दरवर्षी तो चुलत बहिणीकडे भाऊबीजेसाठी येत होता. भाऊबीजेला कुठेही असला तरी अक्षय न चुकता चुलत बहिणीच्या घरी येत होता. मात्र यंदा काळाने घात केला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा आप्त परिवार आहे. पुढील तपास पोंभूर्णा येथील पोलीस उपनिरीक्षक धनराज सेलोकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागोराव नैताम, नरेश निमगडे करीत आहे. भाऊबीजच्या दिवशी भाऊ-बहिणींसोबत घडलेल्या या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.