जाहिरात

Bhandara News : शिपायाने कहरच केला, गावकऱ्यांचा विश्वासघात; ग्रामपंचायतीत फसवणुकीचा मोठा भांडाफोड

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील डोंगरला येथे ग्रामपंचायतमध्येच फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Bhandara News : शिपायाने कहरच केला, गावकऱ्यांचा विश्वासघात; ग्रामपंचायतीत फसवणुकीचा मोठा भांडाफोड
AI Image

Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील डोंगरला येथे ग्रामपंचायतमध्येच फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामपंचायतीच्या शिपायानेच गावकरी आणि ग्रामपंचायतीची फसवणूक करत बोगस पावत्या छापून अवैध वसुली केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, ज्या लोकांच्या नावावर कोणतीही मालमत्ता नाही, त्यांच्याकडूनही कर वसूल करण्यात आले. ग्रामपंचायतीने तक्रार केल्यानंतर आरोपी शिपाई पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

तुमसर तालुक्यातील डोंगरला गावात ग्रामपंचायतीच्या नावाखाली सुरू असलेला हा फसवणुकीचा खेळ अखेर उघड झाला आहे. ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या खेमराज शरणागत या शिपायाने गावकऱ्यांचा विश्वासघात करत बनावट पावत्या छापल्या. या बनावट पावत्यांच्या आधारे गावकऱ्यांकडून घरपट्टी आणि इतर करांच्या नावाखाली पैसे उकळण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या नागरिकांच्या नावावर कोणतीही मालमत्ता नोंदणीकृत नाही, त्यांच्याकडूनही कर वसूल करण्यात आला. इतकच नाही तर अनेकांच्या खोट्या सह्या देखील केल्या आहेत.

नक्की वाचा - Pune News : एका ठगाची चूक अन् अख्ख्या टोळीचा पर्दाफाश; पुण्यात 1 कोटींवरुन मोठा राडा


गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट

ग्रामपंचायतीच्या नोंदी तपासल्यानंतर हा प्रकार उघड झाला. इतकच नाही तर त्यांनी बोगस पावत्या छापल्या. ग्रामपंचायतीच्या QR न वापरता आपला QR वापरत कराचे पैसे आपल्या बँक खात्यात वळते केले. नंतर गावकरी दुसऱ्या वर्षी करपावती मागायला गेले तर त्यात थकीत कर दाखवत असल्याने गावात नागरिकांची ओरडा सुरू झाली. अनेक नागरिकांना दुप्पट टॅक्स भरावा लागला. अखेर  गावकऱ्यांच्या रोषामुळे आमसभा घेण्यात आली. शिपायाला देखील विचारणा केली असताना त्यांनी आपला गुन्हा कबुल केला आहे. नंतर त्याला सभेचा ठराव घेत पदावरून काढून टाकण्यात आलं.

ग्रामपंचायतीने तत्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू करत आरोपी शिपायाला अटक केली आहे. ग्रामपंचायतसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येच अशा प्रकारे फसवणूक झाल्यामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांचा विश्वास डळमळीत झाला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com