कल्याणमधील एका 12 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून अत्यंत निघृणपणे जीवे मारण्यात आले. त्यानंतर पुण्यातही दोन चिमुरडींना पंपात बुडून मारण्यात आलं, हत्येपूर्वी त्यातील एकीचं शोषण करण्यात आलं होतं. या घटनांमुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. कल्याणमधील प्रकरणातील आरोपी विशाल गवळीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. या घटना ताज्या असताना भंडारातून एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. भंडाऱ्यातील एका शासकीय महिला नर्सिंग कॉलेजच्या प्रभारी मुख्याध्यापकाने विद्यार्थिनींना उत्तीर्ण करण्यासाठी शरीर सुखाची मागणी केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भंडारा शासकीय महिला वैद्यकीय नर्सिंग कॉलेजच्या मुलींना उत्तीर्ण करुन देण्यासाठी येथील प्रभारी मुख्याध्यापकाने शरीर सुखाची मागणी केली आहे. विद्यार्थिनीने घडलेली घटना आपल्या पालकांना सांगितल्यावर पालकांनी महाविद्यालयात येऊन त्या प्रभारी मुख्याध्यापकाला चोप दिला आहे. पाच ते सहा मुलींच्या व्हॉटसअॅपवर मेसेज करुन किरण मुरकूट नावाच्या प्रभारी मुख्याध्यापकाने त्यांच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. व्हॉट्सअॅप मेसेजचे प्रिंट आऊट पोलिसांकडे देण्यात आले आहेत.
इतकच नाही तर हा मुरकूटे मुलींसोबत अश्लील वर्तनदेखील करत असल्याचं विद्यार्थिनींनी सांगितलं. त्यानंतर आज २६ डिसेंबरला पालकांनी महाविद्यालयात येत शिक्षकाला चोप दिला. त्यानंतर भंडारा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपी प्रभारी मुख्याध्यापकाला अटक केली आहे.
तर या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सकांनी त्या मुख्याध्यापकाच्या खोलीला सील केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किरण मुरकूट याच्याकडून चार्ज काढून घेण्यात आला आहे. त्याच्याविरोधात तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.