भूपेंद्र आंबवणे
भिवंडीत प्रेम कहाणीचा भयानक अंत झाला आहे. तरुणीच्या शरीराचे दोन तुकडे करण्यात आलं. त्यातशीर सापडलं पण धड सापडलं नाही. 30 ऑगस्टला भिवंडीच्या खाडीलगत असलेल्या झोपडपट्टी परिसरात एकच खळबळ उडाली होती. कारण खाडीच्या किनाऱ्यावर एका तरुणीचं शीर पडलं होतं. याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शिवाय त्यांनी तातडीने या खूनाचा तपास सुरू केला. पण हत्येचा तपास नेमक्या कुठल्या दिशेने करायचा हेच कळत नव्हतं.
ही तरुणी कोण? तिचा शिरच्छेद कुणी केला? तरुणीचं डोकं सापडलं पण धड कुठे आहे? असे अनेक प्रश्न पोलिसांसमोर तपासा दरम्यान होते. पण प्रश्नांची उत्तर कशी शोधायची? हाच मोठा प्रश्न झाला होता. पोलीस आपल्या परीने प्रयत्न करत होते. पण दोन दिवसानंतर त्यांना पहिली लीड मिळाली. हलिफा खान नावाची एक महिला पोलीस ठाण्यात आली होती. तिने दोन दिवसांपासून मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. मुलीचा फोन लागत नव्हता आणि जावई फोन उचलत नव्हता. महिलेने सांगितलेली माहिती ऐकून पोलिसांना संशय आला.
नक्की वाचा - Thane News: नाल्यात सापडले महिलेचे मुंडके, खुनाचे रहस्य पोलिस उलगडणार
त्यानंतर पोलिसांनी महिलेच्या जावयाला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान शीर सापडलेली तरुणीच त्याची पत्नी असल्याचं समोर आलं. परवीन उर्फ मुस्कान अन्सारी असं मृत तरुणीचं नाव होतं. तर तहा अन्सारी असं आरोपीचं नाव आहे. तोच तिचा पती ही आहे. पती -पत्नीमध्ये चारित्र्यांच्या संशयावरून सतत भांडणं व्हायची. पण त्या दिवशीचं भांडण इतकं विकोपाला गेलं की पतीने पत्नीचा शिरच्छेद केला. असं पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी सांगितलं.
दोन वर्षापूर्वीच तहा आणि परवीन यांचा प्रेमविवाह झाला होता. या लग्नापासून त्यांना एक वर्षाचा मुलगा देखील होता. पण दोन वर्षातच या जोडप्याचं प्रेम आटलं. प्रेमची जागा संशयाने घेतली. परवीन इंस्टाग्रामवर रिल्स बनवायची. त्यासाठी ती काही मुलांच्या संपर्कात ही होती. ते तहा अन्सारीला आवडत नव्हतं. यातून दोघांमध्ये वाद पेटला. हळूहळू भांडण वाढत गेली. शेवटी 29 ऑगस्टला तहाने पत्नीची हत्या केली.
हत्येनंतर त्याने पत्नीचं शीर धडावेगळं केलं. खाडीत भरतीचं पाणी वाहत असताना शीर आणि धड पाण्यात टाकलं. आरोपीने ही माहिती दिल्यानंतर पोलिसांनी बोटीच्या सहाय्याने धडाचा शोध सुरू केला. ते अजून ही सापडलेलं नाही. पण या घटनेनं परवीनचं संपूर्ण कुटुंब हादरून गेलं आहे. संशयाचं भूत डोक्यावर बसलं की काय घडू शकतं याचं हे भयानक उदाहरण आहे. भिवंडीतल्या या प्रेम कहानीचा अंत पाहून सगळेच अवाक झाले आहे.