
Crime News: बंगळुरमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. इथे एका 35 वर्षीय महिलेला तिच्या माजी लिव-इन पार्टनरने जिवंत पेटवून दिले. पीडितेचे नाव वनजाक्षी होते. मिळालेल्या माहितीनुसार, वनजाक्षीला भाजलेल्या अवस्थेत रुग्णालयात आणले होते. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, वनजाक्षी विठ्ठल नावाच्या एका मुलासोबत राहत होती. आरोपी एक कॅब चालक असून त्याला दारूचे व्यसन होते. वनजाक्षी जवळपास चार वर्षांपूर्वी त्याच्यासोबत लिव-इन रिलेशनशिपमध्ये आली होती. या आधी तिची दोन लग्ने झाली होती, तर आरोपीची तीन लग्ने झाली होती. विठ्ठलच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे वनजाक्षी त्रस्त होती. त्यामुळेच ती त्याच्यापासून दूर गेली होती.
वनजाक्षीची नुकतीच मारियप्पा नावाच्या एका व्यक्तीसोबत मैत्री झाली होती. विठ्ठलला ही मैत्री आवडली नाही. त्यामुळे त्याने संधी साधून वनजाक्षीला जिवंत जाळले. वनजाक्षी मारियप्पासोबत मंदिरात गेली होती. त्यानंतर ती कॅबने घरी परत येत असताना, एका ट्रॅफिक सिग्नलवर आरोपीने गाडी थांबवली. त्यानंतर वनजाक्षी, मारियप्पा आणि चालकावर पेट्रोल ओतले. वनजाक्षी, मारियप्पा आणि चालकाने गाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. बाकीचे लोक पळून जाण्यात यशस्वी झाले. पण विठ्ठलने वनजाक्षीचा पाठलाग केला. तिच्यावर आणखी पेट्रोल टाकले आणि लायटरने तिला आग लावली.
तेथून जाणाऱ्या एका तरुणाने हा भयावह प्रकार पाहिला. त्याने वनजाक्षीला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याने कपड्याच्या तुकड्याने आग विझवली आणि वनजाक्षीला एका खासगी रुग्णालयात नेले. वनजाक्षी जवळपास 60% भाजली होती. डॉक्टरांनी केलेले प्रयत्नही अपुरे पडले. तिचा काही वेळातच मृत्यू झाला. या घटनेत विठ्ठल स्वतःही भाजला होता. हुलिमावू पोलिसांनी 24 तासांच्या आत त्याला अटक केली आहे.
नारायण एम, आयपीएस, पोलीस उपायुक्त यांनी घटनेची माहिती देताना सांगितले की, "हे संपूर्ण प्रकरण कौटुंबिक वादाचे आहे. जे घडले ते दुर्दैवी आहे. आम्ही 24 तासांच्या आत आरोपीला अटक केली आहे. तिला वाचवण्यासाठी आलेल्या त्या व्यक्तीच्या प्रयत्नांचेही आम्ही कौतुक करतो. तिला वाचवण्याचे सर्व प्रयत्न करूनही, महिलेचा मृत्यू झाला. आरोपीला या गुन्ह्याची किंमत मोजावी लागेल. त्याच्यावर कठोर कलमे लावण्यात आली आहेत. असं त्यांनी स्पष्ट केलं. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world