भूपेंद्र आंबवणे
सध्या अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा धसका अनेकांनी घेतली आहे. त्यांनी एफडीए मार्फत अनेक ठिकाणी धाडी टाकल्या आहे. त्यामुळे भेसळ करणारे, बनावट अन्न बनवणारे, खाद्य पदार्थांच्या ठिकाणी अस्वच्छता ठेवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ही सकारात्मक बाब असताना याचाच गैर फायदा ही काही जण घेत आहेत. तसाच एक हादरवून टाकणारा प्रकार भिवंडीत समोर आला आहे. एक महिलेने आपण एफडीएचे अधिकारी असल्याचे भासवलं. तिच्या सोबत तिची टोळी ही कार्यरत होती. पण तिचे हे सोंग एका चुकीमुळे सर्वांसमोर उघड झाले. भिवंडीतल्या सतर्क नागरिकांनी तिचा डाव उधळून लावला आहे.
तोतया महिला आणि तिची टोळी भिवंडीत कार्यरत होती. गेल्या पंधरा दिवसापासून तिने शांतीनगर हॉटेल, घाऊक विक्रेते यांना आपले लक्ष बनवले होते. शिवाय कारवाईच्या नावाखाली त्यांच्या कडून पैसे उकळण्यास सुरूवात केली होती. मात्र भिवंडीतील्या सतर्क नागरिकांमुळे तिचा डाव उधळला गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शांतीनगर सागर प्लाझा हॉटेल परिसरातील एका घाऊक दुकानात तीन महिला व एक पुरुष आले. त्यांनी आपण एफडीएचे अधिकारी असल्याचे सांगितले. शिवाय तुम्ही शिळे आणि घाणेरडे अन्न पदार्थ विक्री करत आहात असं त्यांना सांगितलं.
ते एवढ्यावरच थांबले नाहीत. या तोतयांनी सांगितले की मुदतबाह्य साहित्याची तुम्ही विक्री करत आहात. हॉटेल चालकाला या गोष्टी सांगून त्यांनी धमकावले. त्यानंतर त्यांच्याकडून पैशांची मागणी केली. तो पाच हजार देण्यास ही तयार झाला होता. पण तिथे सतर्क नागरिक होते. त्यांनी त्यांचा हा डाव उधळून लावला. ही माहिती पोलिसांना दिली. हे पाहाता तिच्या सोबतचे साथिदार तिथून पळून गेली. ही महीला मात्र तिथे अडकली. ती तिथल्या लोकांना धमकावत होती. तुम्हाला पोलिसांकडे नेते. तुमच्यावर केस टाकले. तुम्हाला आत टाकते अशी ती धमकावत होती. त्याचा व्हिडीओ ही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
त्यानंतर शांताबाई दशरथ राजपूत या महिलेस ताब्यात घेण्यात आलं. तिच्या विरोधात समशाद खान व जावेद मोहम्मद चौधरी यांनी तक्रार केली होती. शिवाय या महिलेने आपल्याला फसवलं असल्याचं ही त्यांनी तक्रारीत म्हटलं होतं. त्यांनी गेल्या पंधरा दिवसात अनेक दुकानदारांना गंडा घातला आहे. या गुन्हावरून शांताबाई दशरथ राजपूत व तिच्या तीन साथीदारां विरोधात खंडणी व तोतया अधिकारी बनून धमकावणे या कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. महिलेला अटक करण्यात आली असून चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.