- सक्षम ताटेची नोव्हेंबर २०२५ मध्ये आंचल मामिडवारच्या कुटुंबीयांनी हत्या केली होती
- सक्षमच्या मृतदेहासोबत आंचलने लग्न केले आणि त्याच्या कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता
- तीन महिने राहिल्यानंतर आंचलने सक्षमच्या कुटुंबाचे घर सोडल्याची माहिती सक्षमच्या आईने दिली आहे
सक्षम ताटे आणि त्याची प्रेयसी आंचल मामिडवार यांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा संपूर्ण देशात झाली. त्याचे कारण ही तसेच होते. सहा महिन्या पूर्वी म्हणजे नोव्हेंबर 2025 मध्ये सक्षम ताटेची निर्घुण पणे हत्या करण्यात आली होती. ही हत्या दुसरी तिसरी कुणी नाही तर त्याची प्रेयसी आंचल मामिडवार हिच्या भावाने आणि वडीलांनी केली होती. हा एक ऑनर किलिंगचा प्रकार होता. हत्येनंतर आंचलने सक्षमच्या मृतदेहा सोबत लग्न केलं होतं. याचा व्हिडीओ ही व्हायरल झाला होता. ही दृष्य पाहून संपूर्ण देश आवाक झाला होता. सक्षम गेला पण मी आहे असं म्हणत तिने सक्षमच्या आई-वडीलांना धिर दिली होता. शिवाय त्यांच्या घरी राहण्याचा निर्णय घेतला होता. पण तिन महिने झाले नाहीत तर आंचलने ते घर सोडल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.
नोव्हेंबर महिन्यात नांदेडच्या इतवारा परिसरात सक्षम ताटे या तरुणाची हत्या करण्यात आली होती. सक्षमचे आंचल मामिडवार या तरुणीसोबत प्रेम संबंध होते. मात्र आंचलच्या कुटुंबीयांना हे संबंध मान्य नव्हते. सक्षम हा दलित समाजातला होता. त्यामुळे आंचलच्या कुटुंबीयांना हे नातं मान्य नव्हतं. विशेष म्हणजे सक्षमला आंचलच्या घरातले सर्व जण ओळखत होते. शिवाय आंचलचा भाऊ हा सक्षमचा चांगला मित्र होता. शेवटी त्यानेच सक्षमचा घात केला. आंचलच्या भावाने आणि वडीलांनी सक्षमचा खून केला. त्यानंतर आंचलच्या भावनांचा बांध फुटला होता. तिने आपल्या भावाला आणि वडीलांना फाशी द्यावी अशी मागणी केली होती.
नक्की वाचा - माझा प्रियकर मरूनही जिंकला! मृतदेहाशी केले तरूणीने लग्न; नांदेडमधली 'सैराट' घटना
ज्यावेळी सक्षमचा मृतदेह त्याच्या घरी आणला गेला त्यावेळी याच आंचलने त्याच्या मृतदेहा सोबत लग्न केलं होतं. तिच्या या कृतीची देशभरात चर्चा झाली. प्रेम असावे तर असं असं बोललं जावू लागलं. काही झालं तरी मी वडीलांच्या घरी जाणार नाही. सक्षमच्या आई- वडीलांना त्यांच्या मुला प्रमाणे सांभाळेन असं वचन तिने दिले होते. त्या दिवसापासून ती सक्षमच्याच घरी राहत होती. मात्र आता या प्रकरणात ट्वीस्ट निर्माण झाला आहे. सक्षमच्या घरी तीन महिने राहील्यानंतर हीच आंचल सक्षमच्या घरातून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे. सक्षम ताटेच्या आईने याबाबतचं धक्कादायक वास्तव सर्वां समोर मांडलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळीच कलाटणी मिळाली आहे.
सक्षम ताटेची आई संगीता यांनी एका वृतपत्राला मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. शिवाय आपली व्यथा ही मांडली आहे. संगीता सांगतात की सक्षमच्या मृत्यूनंतर काही महिने आंचल आमच्या सोबत राहीली. त्यावेळी ती सतत सांगत होती. मी सक्षमच्या जागी तुमचा मुलगा आहे. तुमची नेहमी काळजी घेईन. तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. ती साडेतीन महिने आमच्या सोबत होती. एक दिवस तीने तिच्या आजीची तब्बेत बिघडली आहे असं सांगितलं. शिवाय तिला भेटायला जावू का अशी विचारणा ही केली. त्यानंतर मी तिला स्वत: त्यांच्या घरी सोडून आले असं संगीता सांगतात. मात्र ती त्यानंतर घरी परतलीच नाही असं संगीता यांनी सांगितलं. आंचल ही सतत तिच्या कुटुंबीयांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात होती असं ही त्या म्हणाल्या. आम्ही तिच्यावर कोणतेही बंधन घातले नव्हते. मात्र ज्या दिवशी तिने घर सोडले त्यानंतर तिने कोणत्या संपर्क आमच्या सोबत ठेवला नाही.
तिच्याशी संपर्क ही झाला नाही. त्यांनी पुढे सांगितले की सक्षमच्या हत्येनंतर त्याच्या वडीलांची तब्बेत ही खालावली होती. त्यांना प्रचंड त्रास होत होता. त्यातच त्यांचे तीन महिन्यापूर्वी निधन झाले. सक्षम गेला त्यानंतर त्याच्या वडीलांचे ही निधन झाले. त्यात आंचल सोबत सध्या कोणताही संपर्क नाही. त्यामुळे मी एकटीच राहीली आहे असं संगीता यांनी सांगितलं. सक्षमच्या अंत्यसंस्कारावेळी आंचलने मृतदेहासोबत लग्न केले होते. दोघांच्या अंगाला हळद लावण्यात आली होती. ऐवढेच नाही तर आंचलने सक्षमच्या नावाने कुंकू ही लावले होते. त्यावेळी ती म्हणाली होती, मी सक्षमसोबत लग्न केले आहे. तो आज या जगात नसला तरी आमचं प्रेम जिवंत आहे. मी आयुष्यभर त्याच्या आठवणींसोबत जगणार आहे. त्याच्या कुटुंबाची साथ सोडणार नाही. मात्र आज चित्र वेगळं दिसत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world