लक्ष्मण सोळुंके, प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील भोकरदन महसूल विभागाच्या नाजा सज्याच्या तलाठ्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांगता पेन्शन योजनेच्या अर्जावर सही आणि शिक्का देण्यासाठी चक्क तलाठी महाशयाने बिअर बारचं बिल भरण्याची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. नातेवाईकांनी बिल भरण्यास नकार दिल्याने तलाठ्यांच्या मधधुंद अवस्थेत बिअर बारमध्येच समोरं उभा करण्याची मागणी करत अर्जावर केलेली सही खोडल्याचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नेमका काय घडला प्रकार
भोकरदन तालुक्यातील जैनपूर कोठारा गावातील विकलांग असलेल्या सुनीता जाधव या महिलेने नातेवाईकांच्या मदतीने इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांगता पेन्शन योजनेअंतर्गत लाभ मिळावा म्हणून अर्ज केला होता. मात्र या अर्जावर तलाठी यांची स्वाक्षरी आणि शिक्का लागत असल्याने महिलेने वारंवार तलाठ्यांशी संपर्क केला. मात्र तलाठी भेटत नसल्याने महिलेच्या नातेवाईकांनी फोन करून सही आणि शिक्क्याची मागणी केली. यावेळी तलाठीसाहेब बिअर बारमध्ये मद्यप्राशन करीत होते. तलाठ्यांनी नातेवाईकांना बार येथे बोलावून नशेच्या अवस्थेत पैशाची मागणी केली.
नक्की वाचा - बीड पुन्हा हादरलं! कुटुंबीय किंचाळत होते, गयावया करत होते; मात्र गुंड मारहाण करत राहिले, अन्
यावेळी तलाठ्याने अक्षरश नातेवाईकांना सोबत बसा म्हणत नशेच्या अवस्थेत बारचं बिल भरण्याची मागणी केली. अर्जावर सही देखील केली. नातेवाईक बिल भरणार नसल्याचं लक्षात येताच या तलाठी महाशयाने चक्क अर्जावरील सही खोडली. बारमध्येच अर्ज करणाऱ्या महिलेला सामोरं आणण्याची मागणी केली. कसा अर्ज मंजूर होतो म्हणत धमकी देखील दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. हा संपूर्ण प्रकार महिलेच्या नातेवाईकांनी मोबाइल कॅमेऱ्यात कैद केला आहे. तलाठ्याने केलेला धक्कादायक प्रताप समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. .