ऋतिक गणकवार, प्रतिनिधी
Mumbai News : सध्या बाजारात विविध प्रकारचे डेटिंग अॅप सुरू आहेत. मोठ्या संख्येने तरुण-तरुणी या डेटिंग अॅपवर सक्रिय असतात. या अॅपच्या माध्यमातून नवे नातेसंबंध जोडले जात असतात. मात्र यादरम्यान या अॅपच्या माध्यमातून श्रीमंत पुरुषांना जाळ्यात अडकवून पैसे उकळण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील साकीनाका-पवई जवळील एका हॉटेलमधील मोठं रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केलं आहे.
गोड गोड बोलून भेटायला बोलवायच्या अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, २५ ते ३० तरुणी दिल्लीतून मुंबईला आणण्यात आल्या होत्या. या तरुणी एका प्रसिद्ध डेटिंग अॅपच्या माध्यमातून श्रीमंत पुरुषांना जाळ्यात ओढायच्या. डेटिंग अॅपवर लाइक करुन ते चॅटिंगची सुरुवात करायच्या. चॅट केल्यानंतर या तरुणी पुरुषांना भेटायला बोलवित होत्या. घाटकोपच्या साकीनाका येथील कॅफे क्लब कॅफेत हा सर्व प्रकार सुरू होता. धक्कादायक बाब म्हणजे कॅफेचा मालकही या रॅकेटमध्ये सक्रिय होता. तरुणाला कॅफेत आणल्यानंतर मुली त्यांना धमकी द्यायच्या. त्यांना लैंगिक अत्याचाराची तक्रार करण्याची भीती दाखवली जात होती. तर अनेकदा मुली ऑर्डर करत त्याचे अव्वाच्या सव्वा बिल व्हायचे. अनेकदा हे बिल 25 ते 50 हजारांहून अधिक होत असे.
पोलिसांच्या छापेमारीत धक्कादायक प्रकार उघड
पोलिसांनी जेव्हा कॅफे मध्ये छापा टाकला तेव्हा एका पीडित तरुणाला खाली बसवत त्याच्यावर बाऊंसर्सकडून धाक दाखवत पैसे वसुली सुरू होती. याप्रकरणी साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. याशिवाय पोलिसांनी हा कॅफे सील केला आहे. सध्या ३ मुलींना अटक करण्यात आली असून त्यांना खास या रॅकेटसाठी दिल्लीहून आणण्यात आलं होतं.