Purnia Love Affair Talibani Punishment News: प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाला तिच्या कुटुंबांनी रंगेहात पकडल्यानंतर त्यांना तालिबानी शिक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्या प्रेयसीच्या बोलावण्यावरून तिच्या घरी गेलेल्या एका तरुणाला त्याच्या मित्रासह मुलीच्या कुटुंबीयांनी पकडले आणि त्यांच्यावर क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडून अमानुष अत्याचार केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील कृत्यानंद नगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भौकरहा गावात ही संतापजनक घटना घडली आहे.
नेमकं काय घडलं?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडित तरुणाचे नाव असरारुल आहे. तो आपला मित्र तौसीफसोबत प्रेयसीला भेटायला गेला होता. असरारुलची आई बीबी शहनाज यांच्या म्हणण्यानुसार, असरारुल आपल्या बहिणीच्या घरी गेला होता, तेव्हा त्याचा मित्र तौसीफने त्याला फोन करून घरी बोलावले. याच दरम्यान, मुलीचे नातेवाईक मोहम्मद महमूद, नूर खान आणि भूटवा यांनी दोन्ही तरुणांना पकडले.
मुलांना दिली तालिबानी शिक्षा! | Purnia Love Affair
आरोपींनी दोन्ही तरुणांना अर्धनग्न केले. त्यानंतर त्यांच्या डोक्याचे अर्धे मुंडन कापले. चेहऱ्याला काळे फासले आणि गळ्यात चप्पल-बुटमाळा घालून दोरीने बांधले. एवढ्यावरच न थांबता, दोन्ही तरुणांचे हात दोरीने बांधून त्यांना संपूर्ण गावातून धिंड काढून फिरवले. या वेळी त्यांना मारहाणही करण्यात आली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला, ज्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही तरुणांना आरोपींच्या तावडीतून सोडवून ताब्यात घेतले. असरारुलच्या आईने कृत्यानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून आपल्या मुलाला न्याय देण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, तपास सुरू केला आहे, मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
ही तालिबानी शिक्षा केलेल्या तरुणांच्या कुटुंबियांनी आता पोलिसांकडून न्यायाची मागणी केली आहे. तौसिफच्या आईचे म्हणणे आहे की तिच्या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले आहे आणि गावकऱ्यांनी जाणूनबुजून त्याची बदनामी केली आहे. दरम्यान, असरारुलच्या वडिलांनी सांगितले की, कोणताही ठोस पुरावा किंवा तक्रार न करता गावकऱ्यांनी त्यांच्या मुलाला तालिबानी पद्धतीने शिक्षा दिली. त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.