योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News: अकोला जिल्ह्यात सध्या एका खळबळजनक घटनेने राजकीय वातावरण तापले आहे. कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने भाजपच्या एका बड्या नेत्याला तब्बल 2 कोटी रुपयांच्या खंडणीची धमकी देण्यात आली आहे. या धमकीमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणा आता हाय अलर्टवर आली आहे. विशेष म्हणजे ही धमकी सिग्नल ॲपद्वारे देण्यात आली असून यात थेट भाजप आमदाराचे नाव घेऊन पैशांची मागणी करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अकोट भाजपच्या शहराध्यक्षांना हा धमकीचा मेसेज आला आहे. यामध्ये अकोट मतदारसंघाचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांच्याकडून 2 कोटी रुपये वसूल करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. जर ही मागणी पूर्ण झाली नाही, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशारा या मेसेजमधून देण्यात आला आहे.
साधारण 3 ते 4 दिवसांपूर्वी हा प्रकार घडला असून अत्यंत गोपनीय पद्धतीने या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला होता. "आमदारांकडून पैसे वसूल करून दे, नाहीतर तुला आणि आमदाराला पाहून घेऊ," अशा शब्दांत ही धमकी देण्यात आल्याचे समजते.
( नक्की वाचा : Akola News :'टिपू सुलतान'वरून अकोला महापालिकेत तणाव; पाहा, राजकीय वादात AIMIM नं नक्की काय केलं? )
या गंभीर प्रकारानंतर अकोला पोलिसांनी तातडीने पावले उचलली आहेत. धमकी मिळालेल्या भाजप शहराध्यक्षांना तातडीने पोलीस संरक्षण पुरवण्यात आले आहे. अकोट शहरात सध्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तैनात करण्यात आले असून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सायबर विभागाच्या मदतीने या धमकीचा तांत्रिक माग काढला जात आहे. पोलिसांनी अधिकृतपणे यावर सविस्तर बोलण्यास टाळाटाळ केली असली, तरी तपास यंत्रणा अत्यंत वेगाने हालचाली करत आहेत.
( नक्की वाचा : Akola News: उंचीच्या आकड्यांना प्रेमाची चपराक! अकोल्यात पार पडलं असं लग्न, ज्याची गोष्ट ऐकून डोळ्यात येईल पाणी )
कोण आहे शुभम लोणकर?
या धमकीमागे शुभम लोणकर याचे नाव समोर येत आहे. शुभम हा मूळचा अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील नेव्होरी गावचा रहिवासी आहे. त्याचे नाव कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई यांच्याशी जोडले गेले आहे. यापूर्वी त्याला अकोला पोलिसांनी बंदूक तस्करीच्या प्रकरणात अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडून 3 पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. पुण्यातील वार्जे परिसरातून अटक झाल्यानंतर तो जामिनावर बाहेर आला होता. त्याचे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात असल्याने, या धमकी प्रकरणाला पोलीस गांभीर्याने घेत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world