सूरज कसबे, प्रतिनिधी
Pune Crime News : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासून या विभागात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात मोठा राजकीय संघर्ष सुरु आहे.निवडणूक प्रचाराच्या वादातून पिंपरी गावात मध्यरात्री धक्कादायक प्रकार घडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजप उमेदवार उषा वाघेरे यांच्या समर्थकांनी प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उमेदवाराच्या घरात शिरून तोडफोड केली. तसच त्यांना शिवीगाळ करून 33 वर्षीय महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरु आहे.
महिला डॉक्टरशी अश्लील वर्तन करत विनयभंग केला अन्..
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला डॉक्टर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करून रात्री घरी परतल्या होत्या.मध्यरात्री 12.15 च्या सुमारास संशयित आरोपी स्वप्नील वाघेरे,सूरज वाघेरे,सागर वाघेरे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी नवमहाराष्ट्र स्कूलजवळील त्यांच्या घरात बेकायदेशीर प्रवेश केला.घरात घुसून तक्रारदार महिला डॉक्टरशी अश्लील वर्तन करत त्यांचा विनयभंग केला आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.
नक्की वाचा >> महिलेला 10 वर्षानंतर मुंबई लोकलमध्ये भेटली शाळेतील कडक शिक्षिका, व्हिडीओ पाहून विद्यार्थी म्हणाले, या बाईंनी..
जीवे मारण्याची धमकीही दिली
आमच्या विरोधात उमेदवार उभे करण्याचे धाडस कसे केले?तुम्हाला जीवे मारून टाकू,अशी धमकी देत आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली,असं महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे.तसच घरात महिलेचे चुलत सासरे आणि दीरालाही धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आजी सासूलाही ढकलून दिल्याचं तक्रारीत म्हटलंय.आरोपींनी घराबाहेर उभ्या असलेल्या दुचाकी वाहनांचीही तोडफोड केल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.