सातारा जिल्ह्यातील मायणी मेडिकल कॉलेज आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले आरोपी दीपक देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयानं शुक्रवारी (25 ऑक्टोबर 2024) दिलासा दिला आहे. देशमुख यांना उच्च न्यायालानं जामीन मंजूर केला आहे. देशमुख यांची अटक बेकायदेशीर असल्याचं मत न्यायालयानं यावेळी नोंदवलं. देशमुख हे श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे संचालक आप्पासाहेब देशमुख यांचे पुत्र आहेत.
न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने 21 ऑक्टोबर रोजी या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. तो शुक्रवारी जाहीर केला. देशमुख यांची अटक बेकायदेशीर असल्याचं प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचे निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. त्यानंतर तपासात सहकार्य करण्याच्या अटींवर आणि 50 हजार रुपयांच्या मुचलक्यावर न्यायालयानं देशमुख यांना जामीन मंजूर केला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या अटकेला देशमुख यांचे बंधू सचिन देशमुख यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दीपक देशमुखांनी भाजप आमदार जयकुमार गोरे यांचा कोविडकाळातील घोटाळा उघड केला होता. उच्च न्यायालयात दिपक देशमुखांची याचिका न्यायप्रविष्ट असून जयकुमार गोरे आणि त्यांच्या परिवाराच्या चौकशीचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यादरम्यानच ईडीने देशमुख यांना अटक केली होती. त्यामुळे ही अटक निव्वळ राजकीय दबावापोटी केल्याचा आरोप सचिन देशमुख यांनी केला होता.
काय आहे प्रकरण?
दीपक देशमुख यांच्याविरुद्ध वडूज पोलीस स्टेशनमध्ये 2023 साली एका संस्थेची जागा दुसऱ्या संस्थेला बक्षीसपत्राने देत बोगस दस्त केल्याचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात कोट्यवधींचा गैरव्यवहार असल्याने हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे (ED) तपासासाठी सोपवण्यात आले होते. त्याचबरोबर काही गुन्ह्यांचा तपास ‘ईडी'कडून स्वतंत्ररीत्या सुरू आहे. देशमुख यांना या गुन्ह्यात सातारा आर्थिक गुन्हे शाखेत तपासासाठी हजर राहण्यासह अन्य अटींवर न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळाला होता.
( नक्की वाचा : 'माझ्या कुटुंबाला न्याय हवाय' बाबा सिद्दीकीच्या हत्येवर मुलगा झीशानची पहिली प्रतिक्रिया )
सातारा पोलिसांकडे सुरू असलेल्या चौकशीसाठी देशमुख सातारा पोलीस मुख्यालय आले असता ‘ईडी'ने कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. यावेळी सुमारे दीड तास त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.