गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील जसदान तालुक्यातील आटकोट गावात एक लाजिरवाणा प्रकार उघडकीस आला आहे. येथे एका ६ वर्षांच्या निष्पाप मुलीवर अत्यंत क्रूर पद्धतीने अत्याचार करण्यात आले. आरोपीने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न तर केलाच पण तिच्या गुप्तांगात लोखंडी रॉडही घुसवला. या घटनेनंतर दिल्लीतील निर्भया प्रकरणाची आठवण झाली. पोलिसांनी आता आरोपी राम सिंगला अटक केली आहे.
पीडिता राजकोट रुग्णालयात दाखल
मुलगी रक्ताने माखलेल्या अवस्थेत सापडली, तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी मुख्य आरोपी ३० वर्षीय रामसिंह याला जवळील शेतातून अटक केली. रामसिंह हा त्याच भागात शेतीचं काम करीत होता.
पोलिसांकडून १०० संशयास्पद व्यक्तींची चौकशी
वृत्तानुसार, ही मुलगी एका मजूर कुटुंबातील आहे आणि घटनेच्या वेळी ती एका शेतात खेळत होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी १० पथके तैनात केली आणि जवळपास १०० संशयितांची चौकशी केल्यानंतर आरोपींपर्यंत पोहोचले.
मुलीची प्रकृती सध्या स्थिर आहे. आरोपींविरुद्ध पोक्सो कायदा आणि बलात्कारासह गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे आणि गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणात शक्य तितकी कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले आहे.