अमोल गावंडे, बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे रेल्वे रुळावर एका 21 वर्षीय तरुण विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याची घटना उघडकीस आली आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.दुसरीकडे नातेवाईकांनी ही घटना अपघात नसून घातपात असलायचा संशय व्यक्त केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, खामगाव शहरातील खामगाव -जलंब या रेल्वे मार्गावर 21 वर्षीय विद्यार्थ्यांचा मृतदेह मिळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ओम विठ्ठल गिर्हे असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो खामगाव येथील अमृतनगर येथे भाड्याने खोली करून राहत होता. खामगाव येथील आयटीआय प्रशिक्षण संस्थेमध्ये तो फिटर या व्यावसायिक उपक्रमाचे शिक्षण घेत होता.
ओम हा मूळचा देऊळगाव माळी तालुका मेहकर येथील राहणार होता. शनिवारी रात्री त्याने आपल्या कुटुंबीयांशी फोनवर संवादही साधला होता, मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला. ओमच्या नातेवाईकांनी ही घटना घातपात असल्याची शक्यता वर्तवली असून मृतदेहाजवळ असलेले घड्याळ मोबाईल हे दगडाने फोडून ठेवण्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
नक्की वाचा - Shirdi News : भारत-पाकिस्तान युद्धाच्या नावाखाली वृद्धांची लुबाडणूक, साईंच्या शिर्डीतील धक्कादायक प्रकार
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून तपास सुरू केला आहे. विद्यार्थ्यांचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आल्याच्या या घटनेमुळे खामगाव परिसरात दहशत निर्माण झाली आहे.