Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरात सर्वत्र लाडक्या बहिणी केवायसी दुरुस्तीमुळे त्रस्त आहेत. अशातच बुलढाण्यातून एका लाडक्या बहिणीसमोर आणखी एक संकट उभं राहीलं आहे. बुलढाण्यात 'लाडकी बहीण' योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेची घरातूनच नवऱ्याने तिची फसवणूक केली. पत्नी माहेरी गेलेली असताना दुसऱ्याच महिलेला उभं करून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून आलेल्या तिच्या पैशांवर डल्ला मारल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर अनेक सवाल उपस्थित होत आहेत. अशा प्रकारे पैसे काढले जात असतील तर महिलांच्या सुरक्षिततेचं काय हा देखील सवाल आहे.
बुलढाण्यात नेमकं घडलं तरी काय..
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले काही पैसे पतीने परस्पर काढून पत्नीची फसवणूक केल्याची घटना राजगड येथे समोर आली आहे. पत्नीने दुसऱ्याच महिलेला बँकेत उभं करून दोन वेळा पैसे काढले. ही बाब समजतात संतापलेल्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. राजगड येथील नेहा विशाल चव्हाण व पती विशाल चव्हाण यांच्यात कौटुंबिक वाद झाला होता. त्यामुळे पत्नी नेहा माहेरी अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात येणाऱ्या राजनखेड येथे निघून गेली होती. वर्षाभरापासून ती माहेरीच होती. विवाहितेने महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या डोणगाव जिल्हा बुलढाणा या शाखेत बचत खाते काढले होते. पती-पत्नीमध्ये वाद झाल्याने पत्नी माहेरी निघून गेली.
दरम्यान पती विशाल चव्हाण यांनी 11 ऑगस्ट 2025 रोजी डोणगाव शाखेतील महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये दुसरी महिला उभी करून बनावट सही केली आणि बँक खात्यातून 2800 रुपये परस्पर काढून घेतले. तसेच दुसऱ्यांदा ३ नोव्हेंबर 2025 ला तीन हजार रुपये बनावट सही आधारे काढण्यात आले. बँकेमधील कर्मचाऱ्यांनी याची शहनिशा केली नाही असा आरोप महिलेने केला आहे. याप्रकरणी पती विशाल पांडुरंग चव्हाण तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा अधिकार्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पत्नी केली आहे.
शाखाधिकारी काय म्हणतात...
याबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा अधिकारी सचिन गोडे यांनी महिलेच्या खात्यामधून ज्या दोन तारखेला पैसे काढण्यात आले त्याची शहनिशा करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज पाहावे लागतील. दुसरीकडे पैसे काढण्याच्या स्लीपर असलेली सही तपासली जाईल. त्यानंतरच खरे काय ते सांगण्यात येईल अशी प्रतिक्रिया मांडली आहे.