- अमोल सराफ, प्रतिनिधी
Farmer Suicide News: राज्यातील 'बळीराजा संकटात आहे' हे शब्द पुन्हा एकदा अधोरेखित करणारी बुलडाणा जिल्ह्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे. सततची नापिकी आणि डोक्यावर असलेल्या कर्जाच्या ओझ्यामुळे एका तरुण शेतकरी दाम्पत्याने विषारी औषध पिऊन जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत 34 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झालाय तर त्याची पत्नी थोडक्यात बचावली असून तिच्यावर हॉस्पिटलमध्ये औषधोपचार सुरू आहेत.
नापिकीने मोडले कंबरडे
बुलडाण्यातील मेरा बुद्रुक (तालुका चिखली) येथील रहिवासी वंदना सखाराम दाभाडे यांच्याकडे अवघी दोन एकर कोरडवाहू जमीन आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने मुलगा संतोष दाभाडे (वय 34 वर्षे) आणि सून दोघेही स्वतःच्या शेतात राबण्यासोबतच दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. कुटुंबाने बँक ऑफ महाराष्ट्रकडून एक लाख रुपयांचे पीक कर्ज घेतले होते. पण यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीनचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.
(नक्की वाचा: Pune News: पुणे हादरले! 24 वर्षांचा तरुण आणि अल्पवयीन मुलगी; त्या प्रेमप्रकरणाचा अंगावर काटा आणणारा खुलासा)
कर्जाची चिंता आणि टोकाचा निर्णय
हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बँकेचे कर्ज कसे फेडायचे? या विवंचनेत संपूर्ण कुटुंब होते. याच नैराश्यातून 10 फेब्रुवारी रोजी सकाळी संतोष आणि त्यांच्या पत्नीने राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. घटनेची माहिती मिळताच गावचे कोतवाल सचिन पडघान आणि गावकऱ्यांनी दोघांनाही तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान संतोष यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नीची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
(नक्की वाचा: Crime News: मुंबई हादरली! भरदिवसा 19 वर्षांच्या तरुणीची गोळ्या झाडून हत्या, कारण वाचून बसेल धक्का)
गावावर शोककळाअंधेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे मेरा बुद्रुक गावात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. ऐन तरुण वयात संतोष यांनी जगाचा निरोप घेतल्याने एका कष्टकरी कुटुंबाचा आधार हरपलाय.
शेती करताना येणारी संकटे मोठी आहेत, पण आत्महत्या हा त्यावरचा उपाय नाही. टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी कुटुंबीयांचा विचार करा. कोणत्याही संकटात धीर सोडू नका, मदतीसाठी प्रशासनाशी किंवा सामाजिक संस्थांशी संपर्क साधा.