जाहिरात

Buldhana News: काय घडतंय? 2 दिवसांत आठवीतल्या दोन जीवलग मित्रांचा जगाला निरोप! बुलडाण्यात सन्नाटा

Buldhana Student Suicide Case: बुलडाणा शहरातल्या एका प्रसिद्ध शाळेतील आठवीत शिकणाऱ्या दोन वर्गमित्रांनी अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Buldhana News: काय घडतंय? 2 दिवसांत आठवीतल्या दोन जीवलग मित्रांचा जगाला निरोप! बुलडाण्यात सन्नाटा
Buldhana Student : दोन दिवसातील दोन घटनांमुळे बुलडाण्यात खळबळ उडाली आहे. (प्रतिकात्मक फोटो)
बुलडाणा:

अमोल सराफ, प्रतिनिधी

Buldhana Student Suicide Case: बुलडाणा शहरातल्या एका प्रसिद्ध शाळेतील आठवीत शिकणाऱ्या दोन वर्गमित्रांनी अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांनी आपापल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. अवघ्या 14 वर्षे वयाच्या दोन चिमुरड्यांनी लागोपाठ अशा प्रकारे आत्महत्या केल्याने पालकवर्ग आणि शैक्षणिक क्षेत्रात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या धक्कादायक घटनांमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय आहे प्रकरण?

पहिली घटना बुधवार, 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास छत्रपती नगर परिसरात घडली. येथील भारत विद्यालयात आठवीत शिकणारा नमन अरुण राऊत हा विद्यार्थी घरी एकटाच होता. त्याचे आई आणि वडील दोघेही पेशाने शिक्षक असून ते आपल्या कर्तव्यावर बाहेरगावी गेले होते. याच दरम्यान नमनने राहत्या घरातील अभ्यास करण्याच्या खोलीत छताला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे राऊत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

( नक्की वाचा : Satara News: साताऱ्यातील शेतकऱ्याला 1 कोटी 80 लाखांचा गंडा,मुंबईच्या नगरसेविकेसह मंत्रालयातील 'बाबू' रडारवर! )
 

नमनच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच, आज शनिवारी, 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता त्याचा वर्गमित्र अथर्व वैभव राणे यानेही टोकाचे पाऊल उचलले. अथर्व हा सुंदरखेड परिसरात राहत होता आणि त्याचे वडील कारागृह पोलीस म्हणून कार्यरत आहेत. शाळेतून घरी परतल्यानंतर अथर्वने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. दोन दिवसांच्या अंतराने एकाच वर्गातील दोन मित्रांनी अशा प्रकारे आयुष्य संपवल्याने बुलढाणा शहरात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

( नक्की वाचा : Ulhasnagar News :उल्हासनगरच्या भर चौकातून उचलले अन् माथेरानच्या लॉजवर नग्न करून अमानुष छळ! कारण काय? )

या दोन्ही मुलांनी इतक्या लहान वयात टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या अनाकलनीय आणि दुर्दैवी घटनांमागील नेमके कारण शोधण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे राहिले आहे. लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे मुलांच्या मानसिक आरोग्याचा आणि त्यांच्यावर असलेल्या दबावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


 

Helplines
Vandrevala Foundation for Mental Health9999666555 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com