Ashok Kharat Latest News : मर्चंट नेव्हीचा माजी अधिकारी,15 भाषांवर प्रभुत्व,अंकशास्त्रज्ञ आणि स्वत:ला महादेवाचा अवतार समजणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातला नाशिक क्राईम ब्रँचने अटक केली. महिलांचं लैंगिक शोषण आणि जादूटोण्याचा मास्टरमाईंड निघालेला खरात काही बड्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचं समजते. खरातसोबतचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा काल राजीनामा दिला. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, मर्चंट नेव्ही ते भोंदू बाबा असा खरातचा प्रवास नेमका कसा होता? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
अशोक खरातची सुरुवात मर्चंट नेव्हीच्या माध्यमातून झाली. वेगवेगळ्या देशांना भेट दिल्याने त्याला अनेक आंतरराष्ट्रीय भाषा यायच्या. त्यानंतर त्याने दाक्षिणात्य भाषाही शिकल्या. खरात जवळपास 15 भाषा बोलतो. मर्चंट नेव्हीत राहूनच त्याने अंकशास्त्र (Numerology)चं अध्ययन सुरु केलं आणि याच्याच आधारे त्याने लोकांचं भविष्य सांगणं सुरु केलं. त्यानंतर त्याने भक्तांना सांगितलं की, तो स्वत:शंकर देवाचा अवतार आहे. तसच त्याला ब्लॅक मॅजिक येतं, असंही दावा त्याने केला होता. यामुळे अनेक लोक त्याला घाबरायचे, असं म्हटलं जातं.
कालांतराने खरातकडे राजकीय नेतेही येऊ लागले आणि त्यांना सल्ला देण्याचं काम तो करू लागला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्याचे संबंध असल्याचं सांगितलं जातं. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासोबतही त्याचे जवळचे संबंध असल्याचं समोर आलं.
नक्की वाचा >> Ashok Kharat: अशोक खरातचा दगडी बंगला चर्चेत! राजकीय नेते अन् सेलिब्रिटीही यायचे, 'ब्रम्हसदन'चा Video व्हायरल
महिलांचं लैंगिक शोषण आणि जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत अशोक खरातला अटक झालीय. अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगण्याच्या माध्यमातून अधिकारी प्रमोशन, पोस्टिंग आणि करिअरसंबंधीत प्रश्नही खरातला विचारायचे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी आणि गवळणी विभागात त्याने काही अधिकाऱ्यांच्या पत्नींसोबत मिळून जमिनही खरेदी केली होती. याशिवाय त्याने नातेवाईकांच्या नावावरही संपत्ती केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,रुपाली चाकणकर, माजी मंत्री दीपक केसरकर आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटीलसह अनेक लोक त्याच्या संपर्कात होते.
कसा झाला खरातचा पर्दाफाश?
12 मार्च रोजी शिर्डीत एका तरुणीने अश्लील फोटो व्हायरल करण्याच्या धमकी प्रकरणात नीरज जाधव नावाच्या व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली. नीरज, खरातच्या कार्यालयात काम करायचा. नीरजने खरात आणि तरुणीचे आक्षेपार्ह फोटो काढले होते, असं तपासात समोर आलं. ते फोटो पाठवून तो तरुणीला ब्लॅकमेल करायचा. पीडितेनं याप्रकरणी शिर्डी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस तपासात नीरजकडे अनेक व्हिडीओ सापडले. त्यानंतर अन्य एका महिलेनं नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली.त्यानंतर नाशिक क्राईम ब्रँच एका खंडणी प्रकरणाचाही तपास करत होते.
नक्की वाचा >> Shirdi News: अशोक खरातचं शिर्डी कनेक्शन आलं समोर, शिर्डी अन् परिसरात असं काही केलं..सर्वत्र उडालीय खळबळ!
17 मार्चच्या रात्री पोलिसांनी अशोक खरातला त्याच्या राहत्या घरी अटक केली. याआधी डिसेंबरमध्ये सिन्नरच्या वावी पोलीस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.यामध्ये खरात स्वत:तक्रारदार होता. 29 डिसेंबर 2025 ला त्याने पुण्यातील राजेंद्र जासूद आणि मुंबईच्या दिनेश परबवर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. दोघेही आक्षेपार्ह फोटोंच्या माध्यमातून ब्लॅकमेल करत असल्याचं आरोप त्याने केला होता. परंतु, पोलीस तपासात खुद्द खरातचे अश्लील व्हिडीओ सापडले.त्यानंतर 18 मार्चला राज्य सरकारने याप्रकरणाशी जोडलेल्या तिन्ही गुन्ह्यांसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केलं. तेजस्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.
15 वर्षांत खरात बनला 200 कोटींचा मालक
कॅप्टन अशोक खरातने अंकशास्त्राच्या आधारे फक्त राजकीय नेत्यांनाच नाही तर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचं भविष्य सांगून जवळपास 200 कोटींची संपत्ती गोळा केली, अशी माहिती तपासात समोर आल्याचं कळते.
अशोक खरातची संपत्ती
नाशिक (पाथर्डी) : जवळपास 150 कोटींची 30 एकर जमिन.
जवळपास 2 कोटी रुपये किंमतीची 45 एकर जमिन, (सिन्नर)
पत्नीच्या नावावर 30 कोटींहून अधिकची संपत्ती
सिन्नर तालुक्यात 10 कोटींचा मोठा फार्महाऊस
2 कोटी रुपयांचं वर्षाचं टर्नओव्हर
ओझर विमानतळाजवळ जवळपास 5 कोटी रुपयांची जमिन
शिर्डीत प्राईम लोकेशनवर कोट्यावधी रुपयांची जमिन