मनोज सातवी/ सातवी
Crime News: पालघर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या जिल्हा कार्याध्यक्षविरोधात लैंगिक शोषण आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जव्हार पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कमळकार धूम असे आरोपीचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने पीडित महिलेला तिच्या नवऱ्याला सोडचिठ्ठी द्यायला लावली. तसेच आपल्या राजकीय ओळखीने नोकरी देण्याचे आणि लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप पीडित महिलेने केले आहेत. फसवणूक होत असल्याचे कळताच पीडित महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर हे प्रकरण समोर आले. कमळाकर धूम हा पालघर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) जिल्हा कार्याध्यक्ष असून तो डेंगाचीमेट ग्रामपंचायतीचा सरपंच देखील आहे.
(नक्की वाचा: रुग्णालयात नेतो सांगून मालवाहू चालकाने तरुणाला जंगलात फेकलं; 2 दिवसांनी सापडला मृतदेह)
नेमके काय आहे प्रकरण?
कमळाकर धूमविरोधात एका महिलेने लैंगिक अत्याचार व लग्नाचे आमिष दाखवून तिचा संसार मोडल्याचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमळाकरने तिला कायमस्वरुपी सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. यादरम्यान दोघांची ओळख वाढली. पण आरोपीने परिस्थितीचा गैरफायदा घेतल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. तसेच पैसा देखील उकळल्याचा पीडितेचा आरोप आहे.
(नक्की वाचा: धावत्या लोकलमध्ये 2 गटांत जोरदार राडा, प्रवाशाला गमवावा लागला जीव)
महिलेने उचलले टोकाचे पाऊल
दरम्यान अनैतिक संबंधाच्या संशयावरून पीडित महिला व तिच्या पतीमध्ये वाद होऊ लागले. इतकेच नव्हे तर या दोघांच्या नातेसंबंधांचे पुरावे देखील पतीने पीडित महिलेच्या कुटुंबीयांना दिले. घडलेली घटना पीडितेने कमळाकर धूमला सांगितल्यानंतर 'मी तुझ्याशी लग्न करेन, तू नवऱ्याला सोडचिठ्ठी दे', असे सांगत संसार मोडल्याचाही आरोप तिने केला. पण यानंतर हळूहळू कमळाकरने पीडितेसोबत संपर्क साधणे कमी केले, यामुळे अखेर पीडितेने आरोपीविरोधात पाच पानांची चिठ्ठी लिहून कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
(नक्की वाचा: 'ड्राय डे'ला मद्यविक्री करणं पडले महागात, रेस्टॉरंटवर मोठी कारवाई)
आरोपी फरार
पीडित महिलेवर सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. पीडितेचा जबाब नोंदवून पोलिसांनी कमळाकर धूमविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.