चंद्रपूरातील राजकारणाने आता टोक गाठलं आहे. अपक्ष उमेदवारांच्या बॅनरवर शेणफेक करण्यात आली. कुणाचे बॅनर फाडण्यात आले. आतातर या राजकीय (Assembly Election 2024) नेत्यांचा करामतीमुळे गरीब शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी गावा गावात चिकन-मटण पार्ट्यांचं आयोजन केलं जात आहे. चंद्रपुरातील एका पार्टीत धक्कादायक प्रकार घडला आहे. या पार्टीत उरलेला शिळा भात खाल्याने सहा बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर पंधरा बकऱ्या मरणाच्या दारावर उभ्या आहेत. ही घटना मूल तालुक्यातील फिस्कुटी गावात घडली आहे.
नक्की वाचा - 'गद्दार गद्दार'च्या घोषणा, मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवला अन् थेट गाठलं काँग्रेस कार्यालय; पुढे काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, बल्हारपूर मतदारसंघात येणाऱ्या मूल तालुक्यातील फिस्कुटी गावात दोन दिवसांपूर्वी एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराची पार्टी झाल्याची गावात चर्चा आहे. या पार्टीत राहिलेले शिळे अन्न मोकळ्या भागात फेकण्यात आलं होतं. दोन दिवसांपासून अन्न तसंच पडून होतं. दरम्यान या भागात चरण्यासाठी गेलेल्या बकऱ्यांच्या कळपातील काही बकऱ्यांनी ते अन्न खाल्लं. त्यामुळे त्यांचे पोट फुगले. यातच गावातील जनार्धन जिल्लेवर यांच्या मालकीच्या दोन बकऱ्यांचा आणि दशरथ बोरुले यांचा दोन बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर पंधरा बकऱ्या मरणाचा दारावर उभ्या आहेत. या घटनेमुळे बकऱ्यांचा मालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे गावात संताप व्यक्त केला जात आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पार्टी जीवावर बेतली, माजी उपसरपंचाचा विहिरीत पडून मृत्यू
एका उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित पार्टीत माजी उपसरपंचाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर जिल्हात घडली. वरोरा तालुक्यातील फत्तेपूर इथे प्रमोद मगरे या काँग्रेसच्या कार्यकर्त्याने आपल्या गिट्टी क्रशर परिसरात कार्यकर्त्यांसाठी रात्रीभोजन आयोजित केलं होतं. यात जवळच्या पांझुर्णी येथील माजी उपसरपंच गजानन काळे हे सहभागी झाले. पार्टी सुरू असतानाच काळे एका सहकाऱ्यासह लगतच्या मोकळ्या जागेत गेले आणि तेथील विहिरीत पडले. आवाज येताच सगळे धावले. एकाला पोहता येत असल्याने तो वाचला. मात्र गजानन काळे बुडाले.