Chandrapur kidney racket : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथुर येथील रोशन कुडे या शेतकऱ्याने सावकाराच्या पाशात अडकून स्वतःची किडनी विकण्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणाची देशभर चर्चा सुरू झाली. या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. याच प्रकरणात पोलिसांनी सोलापूर येथील रामकृष्ण सुंचु ऊर्फ डॉ. कृष्णा याला अटक केली. त्यानेही स्वतःची किडनी विकल्याचे समोर आले होते आणि त्यानंतर तोही या किडनी रॅकेटमध्ये दलाल म्हणून काम करू लागला. कृष्णा या व्यक्तीमुळे तो या तस्करीत सहभागी झाला त्याच्यापर्यंत चंद्रपूर पोलीस पोहोचली आहे.
दरम्यान या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीच्या अटकेनंतर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंजाबमधील मोहाली येथून हिमांशु भारद्वाजला अटक करण्यात आलं आहे. ३४ वर्षांचा हिमांशू किडनी रॅकेटमध्ये कसा अडकला याचा तपास घेण्यात आला तर पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. प्रेयसीच्या नादात हिमांशूने हे धक्कादायक कृत्य केल्याचं समोर आलं आहे.
प्रेयसीसाठी किडनी विकली....
हिमांशू याने सिंगापूर येथील एका हॉटेल मॅनेजमेंटचं प्रशिक्षण घेतलं. भारतात परतल्यानंतर तो मोहालीतील नर्सचं काम करणाऱ्या तरुणीच्या प्रेमात पडला. त्याने तिच्यावर लाखोंचे पैसे उधळल्याचं समोर आलं आहे. त्याने स्वत:च्या पैशाने तिला अमेरिकेत पर्यटनासाठी पाठवलं होतं. मात्र त्याच्यासोबत नात्यात असताना तिचे दुसऱ्या तरुणाशी प्रेमसंबंध जुळले. तिने दुसऱ्याशी विवाह केला. मात्र तोपर्यंत हिमांशूवरीत कर्जाचा बोजा वाढला होता. त्याचा मोहालीतील टूर अँड ट्रॅव्हलचा व्यवसायही अडचणीत सापडला होता. दरम्यान त्याच्यावरील कर्ज दिवसेंदिवस वाढत होतं. अशातच त्याने किडनी विकण्याचा निर्णय घेतला.
तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू...
हिमांशू भारद्वाज याने प्रेयसीच्या नादात आर्थिक अडचणीत सापडल्यानंतर किडनी विकली. नंतर तो ही या रॅकेटचा भाग झाल्याची माहिती पोलिसाच्या तपासात पुढे आली आहे. भारद्वाजच्या पोलीस कोठडीत 29 डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. प्रकरणातील तिसरा आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही.