अभिषेक भटपल्लीवार, प्रतिनिधी
Chandrapur Kidney Case : चंद्रपूर जिल्ह्यात उघड झालेल्या किडनी विक्री प्रकरणात पोलिसांच्या विशेष पथकाला आणखी एक यश मिळालं आहे. दोन दिवसांपूर्वी कृष्णा नावाच्या आरोपीला चंदीगड येथून अटक केल्यानंतर काल पंजाबमधील मोहाली येथून हिमांशू रुषीपाल भारद्वाज (वय ३४) याला पकडण्यात आलंय. विशेष म्हणजे अटक केलेल्या दोघांनीही स्वतःची किडनी विकली आहे. त्यानंतर ते या रॅकेटमध्ये सक्रिय झाले. या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे. तो कोलकाता इथे वास्तव्यास असल्याची माहिती असून पोलीस त्याच्या मागावर आहेत.
आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता...
चंद्रपूर जिल्ह्यातील मिंथूर येथील शेतकरी रोशन कुडे याने हे प्रकरण समोर आणले होते. त्यानंतर राज्यभर मोठी खळबळ उडाली आणि लगेच पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून तपासाला गती दिली. प्रारंभी सावकारी कर्जाचे हे प्रकरण वाटत असताना त्यात आंतरराष्ट्रीय किडनी व्यापाराचा नवा अँगल समोर आला. किडनी विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधार रामकृष्ण मल्लेशाम सुंचू (रा. प्रियदर्शनी नगर, सोलापूर) सध्या विशेष तपास पथकाच्या ताब्यात आहे. त्याच्याकडून आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. रामकृष्ण (डॉ. कृष्णा) आणि रोशन कुडे यांच्या संपर्कात असलेल्या भारद्वाजच्या मागावर तपास पथक होते. तो वारंवार लोकेशन बदलत असल्यामुळे आतापर्यंत हाती लागत नव्हता. मात्र काल रात्री त्याला मोहाली येथे अटक करण्यात आली. चंदीगडवरून विमानाने त्याला नागपूरला आणण्यात आले असून, त्यानंतर ब्रह्मपुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. रात्री उशिरा त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. त्याच्यावर मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा, १९९४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चीनच्या रुग्णावर प्रत्यारोपण
कुडे आणि इतर पाच जण किडनी विक्रीसाठी ऑक्टोबर २०२४ मध्ये कंबोडियाला गेले होते. त्यावेळी केअरटेकर म्हणून भारद्वाज त्यांच्यासोबत होता. विशेष म्हणजे, समाजमाध्यमांवरील ‘किडनी डोनर कम्युनिटी' हे पेज स्वतः भारद्वाजच चालवत होता. तो हाती लागल्याने किडनी विक्री प्रकरणातील पीडितांची संख्या आणि या रॅकेटची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. कंबोडियातील फ्नॉम पेन्ह येथील ‘प्रेआ केट मेअलिया' रुग्णालयात १४ ऑक्टोबर २०२४ रोजी रोशन कुडे यांची किडनी काढण्यात आली. त्याच दिवशी १२ तासांच्या आत एका चीनच्या रुग्णावर प्रत्यारोपण करण्यात आले. या रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणासाठी मोठ्या संख्येने चीनमधील रुग्ण येतात. दरम्यान, या रुग्णालयातीलच एक डॉक्टर भारतातील तस्करीचे रॅकेट चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
