राहुल कुलकर्णी
पुण्याच्या बोपदेव घाटात 20 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या या गुन्हाप्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात मुख्य आरोपीसह एकूण दोघांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील तिसरा आरोपी अद्याप फरार असून 60 दिवस उलटून गेल्यानंतरही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये. सदर घटनेतील पीडित मुलगी ही दुसऱ्या राज्याची मूळ नागरीक असून ती शिक्षणासाठी पुण्याला आली होती. पीडिता आणि तिचा मित्र बोपदेव घाट परिसरातील "टेबल टॉप" येथे गेले होते. तिथे तीन आरोपींनी पीडितेच्या मित्राला मारहाण केली आणि नंतर पीडितेवर सामूहीक अत्याचार केले. पोलिसांनी सदर गुन्ह्यात रवि प्रसाद कनोजिया आणि शोएब उर्फ अख्तर बाबू शेख या दोघांना अटक केली आहे.
नक्की वाचा :एका महिलेला कपडे बदलताना पाहिलं, दुसरीने टेलरला भररस्त्यात धू धू धुतला; Video Viral
प्रकरण काय आहे?
- 20 वर्षीय पीडित मुलगी गुजरातमधून पुण्यात शिक्षणासाठी आलेली असून, ती इव्हेंट मॅनेजमेंटची विद्यार्थिनी आहे.
- पीडिता तिच्या मित्रासह बोपदेव घाटात 3 ऑक्टोबरला रात्री 11 वाजता गेली होती
- तीन आरोपींनी “टेबल टॉप” परिसरात पीडितेच्या मित्रावर हल्ला करून त्याचा शर्ट आणि पँट फाडली.
- त्यानंतर पीडित मुलीला जवळच्या झुडपात नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
आरोपी कोण आहेत?
- रवी प्रसाद कनोजिया हा पहिला आरोपी असून तो उंद्री येथे मजूर काम करायचा, रवीला 11 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती.
- शोएब उर्फ अख्तर बाबू शेख हा या गुन्ह्याचा मास्टर माईंड आहे.
- शेख हा कुख्यात गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्याविरोधात बलात्काराचे दोन गुन्हे दाखल आहेत
- शेख याला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून 14 ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती.
- तिसरा आरोपी अजून फरार आहे.
बलात्कारासह चोरी हा मुख्य उद्देश
सदर गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की बलात्कारासह चोरी हा आरोपींचा मुख्य उद्देश होता. पोलिसांना आरोपींकडून सोन्याची चेन मिळाली होती जी पीडितेने आपलीच असल्याचे पोलिसांना ओळख परेड दरम्यान सांगितले होते. पोलिसांना आरोपींकडून धारदार शस्त्रेही मिळाली होती. 20 वर्षांची पीडिता आणि तिचा मित्र या दोघांनी ओळक परेडदरम्यान आरोपींना ओळखले. या दोघांचाही जबाब न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवण्यात आला असून हा जबाबदेखील आरोपपत्रासोबत सीलबंद लिफाफ्यातून सादर करण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
500 पानांचे आरोपपत्र
पोलिसांनी आरोपींविरोधात 500 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. सदर प्रकरण पुणे सत्र न्यायालयात सुरू आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये सदर गुन्ह्याचा शेख हा मास्टर माईंड असून त्याच्याविरोधात बलात्काराच्या दोन गुन्ह्यांसह एकूण 8 गुन्ह्यांची नोंद आहे. 2019 पासून त्याच्याविरोधात हे गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत. या सगळ्या प्रकरणांमध्ये शेख हा जामिनावर सुटलेला आहे. शेखचे खरे नाव अख्तर झमीर लखपती आहे. त्याने त्याच्या घरात असलेले आणि सासऱ्यांकडे असलेली अस्सल कागदपत्रे जमा करून दोन आधारकार्ड तयार करून घेतली होती. ही दोन्ही आधारकार्ड पोलिसांनी जप्त केली आहेत.