Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, लग्नाला नकार दिल्याने प्रियसीने प्रियकराची हत्या केली आहे. हर्सूलमधून ३१ जुलैला बेपत्ता झालेल्या 32 वर्षीय सचिन पुंडलिक औताडे याचा प्रेम प्रकरणातून गळा चिरून खून झाल्याची बाब समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
कॅनॉट भागात त्याच्या प्रेयसीने तिच्या मामेभावाच्या मदतीने सचिनचा काटा काढला आणि त्यानंतर पैठणला गोदावरी नदीत त्याचा मृतदेह फेकला. वाहत गेलेला हा मृतदेह अहिल्यानगर जिल्ह्यातील मुंगी येथे तरंगत काठावर आला. त्यानंतर या खुनाला वाचा फुटली. अहिल्यानगर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवित चार दिवसांत २ खुन्यांना बेड्या ठोकल्या. अद्याप एक आरोपी पसार आहे. दुर्गेश मदन तिवारी (रा. वडोद कान्होबा, ता. खुलताबाद), भारती रवींद्र दुबे (रा. फ्लॅट नं. २०१, , एस. एस. मोबाईल शॉपी जवळ, कॅनॉट प्लेस सिडको) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. अफरोज खान (रा. कटकट गेट) हा पसार आहे.
Archana Tiwari: रक्षाबंधनासाठी निघाली, पण घरी पोहोचलीच नाही, 12 दिवस झाले, नेमकं काय घडलं?
मृत सचिनचा भाऊ राहुल पुंडलिक औताडे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, ३१ जुलैला दुपारी साडेबारा वाजता सचिन हा घरात कोणालाही काहीही न सांगता दुचाकी घेऊन बाहेर गेला होता. त्यानंतर त्याचा काहीही शोध लागला नव्हता. त्यावरून हर्सूल पोलीस ठाण्यात बेपत्ताची नोंद करण्यात आलेली होती. १३ ऑगस्टला मुंगी येथील शेतकरी सदाशिव राजेभोसले यांच्या शेताच्या कडेला गोदावरी नदीच्या पात्रात मृतदेह आढळला होता.
त्यावरून शेवगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मृताच्या उजव्या हातावर मराठीत सचिन असे लिहिले असून मानेच्या उजव्या बाजुला इंग्रजीत भक्ती असे लिहिलेले आहे. याबाबत सर्वत्र माहिती देत हर्सूल ठाण्यात बेपत्ताची नोंद असल्याचे समोर आले. हा मृतदेह सचिन औताडेचा असल्याचे स्पष्ट झाले.
राहुल औताडे यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना एका मित्राने माहिती दिली की, ३१ जुलैला सचिन हा त्याची प्रेयसी भारती दुबे हिच्यासोबत होता. ते दोघे जालना येथे चारचाकीने लग्नाला गेले. तेथून परत कॅनॉटमध्ये येऊन फ्लॅटवरच थांबले. तेथे ते दोघे दारू पिले होते. त्या रात्री सचिन तेथेच थांबला होता. तेथेच भारती आणि सचिनचा वाद झाला. भारतीने तिचा मामेभाऊ दुर्गेश तिवारीला बोलावले. दुर्गेशने चाकूने गळा चिरून सचिनचा खून केला.
लग्न करण्यास नकार दिल्याने काढला काटा
अहिल्यानगर पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी भारती दुबे ही स्थानिक छावा संघटनेची महिला पदाधिकारी आहे. सचिन औताडे हा त्याच संघटनेत काम करीत होता. ते दोघेही विवाहित आहेत. मात्र, भारतीने फारकत घेतली होती. सचिन आणि भारतीचे प्रेमसंबंध होते. भारतीने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला होता. तो विवाहित असल्याने नकार देत होता. त्याच्या कुटुंबीयांकडूनही या लग्नाला विरोध होता. मात्र, सचिन हा भारतीवर संशय घ्यायचा. त्यातून त्यांच्यात वाद झाला. त्यात त्याने लग्नाला नकार दिल्यामुळे भारतीने मामेभावाच्या हाताने त्याचा काटा काढला.