Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका नराधम पित्याने आपल्याच अवघ्या ५ वर्षांच्या निष्पाप चिमुरड्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या विकृत कृत्यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पीडित बालकाच्या ३२ वर्षीय मातेने दिलेल्या तक्रारीवरून सातारा पोलिसांनी नराधम पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
गच्चीवरुन फेकून देण्याची धमकी...
मिळालेल्या माहितीनुसार, हे पीडित कुटुंब मूळचे परभणी जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या छत्रपती संभाजीनगर येथील एका गृहप्रकल्पात वास्तव्यास आहे. सन २०२५ पासून फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आरोपी पित्याने हे घृणास्पद कृत्य केलं. घरात कोणीही नसताना वेगवेगळ्या वेळी त्याने निष्पाप बालकाला आपल्या वासनेचा बळी बनवलं. इतकेच नव्हे तर, हे कृत्य जर कोणाला सांगितलं किंवा आईला माहिती दिली, तर इमारतीच्या गच्चीवरून खाली फेकून देण्याची क्रूर धमकीही या नराधमाने चिमुरड्याला दिली होती. या भीतीमुळे बालक प्रचंड दहशतीखाली होते.
वाढदिवशी ५ वर्षांच्या चिमुरड्याने सांगितला धक्कादायक प्रकार
या सततच्या अत्याचारामुळे बालकाच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला होता. अलीकडेच बालकाच्या वाढदिवसानिमित्त घरात आनंदाचे वातावरण असताना, तो अचानक अत्यंत गंभीर आणि अबोल झाला. मुलाची ही बदललेली वर्तणूक पाहून आईला संशय आला. तिने अत्यंत विश्वासाने मुलाला जवळ घेऊन चौकशी केली असता, चिमुरड्याने त्याच्यासोबत घडलेला अंगावर काटा आणणारा सर्व प्रकार रडत रडत सांगितला. पोटच्या मुलावर स्वतःच्या पतीनेच असा अत्याचार केल्याचे ऐकून मातेला प्रचंड धक्का बसला. त्यानंतर महिलेने शिवसैनिकांच्या मदतीने पोलीस ठाणे गाठून पोलिसांना हकीकत सांगितली आणि गुन्हा दाखल केला.