अमोल पाटील, प्रतिनिधी
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. शहरात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण गेल्या ७२ तासांत सलग तिसऱ्या दिवशी शहरात रक्ताचा सडा सांडला असून आज रात्री पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने शहर हादरले आहे.
गोळीबाराच्या घटनांमुळे शहर हादरलं...
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आज रात्री ९:३० वाजेच्या सुमारास शहरातील वर्दळीच्या हनुमान चौक परिसरात दोन गटात जोरदार भांडण झाले. हे भांडण इतक्या विकोपाला गेलं की, एका तरुणाने चक्क बंदूक काढून भररस्त्यात हवेत दोन गोळ्या झाडल्या सुदैवाने या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र प्रत्यक्षदर्शींमध्ये भीतीचे प्रचंड वातावरण पसरले आहे. गेल्या ३ दिवसांतील घटनांचा आढावा बघता पहिली घटना एपीआय कॉर्नर परिसरात झालेला जीवघेणा चाकू हल्ला.
त्यानंतर दुसरी घटना काल रात्री बीड बायपास परिसरात एका वकिलाची निर्घृण हत्या करण्यात आली तर तिसरी घटना आज १६ एप्रिलच्या रात्री हनुमान चौकात झालेला गोळीबार. एकामागून एक घडणाऱ्या या घटनांमुळे संभाजीनगरमधील सुरक्षिततेवर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. वकिलाच्या खुनाची घटना ताजी असतानाच, २४ तास उलटायच्या आत गोळीबाराचा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे सावट आहे. पोलीस प्रशासन या गुंडांवर वचक बसवणार की गुन्हेगारांचे हे धाडस असंच वाढत राहणार? हाच प्रश्न आता सामान्य नागरिक विचारत आहेत.