लोकसभा निवडणुकीतील मतदानावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी; महिला सरपंचाचे कुटुंब गंभीर जखमी

भाजपच्याच माजी सरपंच आणि आजी सरपंच यांच्यात लोकसभा निवडणुकीत मतदानावरून झालेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
जालना:

13 मे रोजी चौथ्या टप्प्याचं मतदान पार पडलं आहे. यावेळी नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजी नगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या 11 मतदारसंघातील मतदारांनी त्यांचा हक्क बजावला. यावेळी जालना मतदारसंघातही मतदान पार पडलं. येथे विरोधी मतदान दिलं या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी घडल्याचा प्रकार समोर आला आहे.  

टेभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कुंभारझरी गावात लोकसभा निवडणुकीत विरोधी मतदान का केले, या कारणावरून भाजपाच्याच दोन गटात तुंबळ हणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत सरपंच पतीसह महिला सरपंच सासू, नणंद गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री 9 च्या सुमारास घडली आहे. या घटनेत जखमी झालेल्या महिला सरपंच यांच्यासह पती, सासू, नणंद यांना उपचारासाठी टेभूर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

गावातील भाजपाच्या दुसऱ्या गटाने विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मतदान का केले, असा आरोप करत माझ्या पतीला घराच्या दारातून ओढत घेऊन जाऊन त्यांच्या घरात कोंडून मारहाण केल्याचा आरोप एका महिला सरपंच यांनी केला आहे. तर पतीला वाचवण्यासाठी गेलो असता सासू, नणंद,आणि मला ही लाठ्या काठ्यांनी मारहाण करत कपडे फाडून पुरुषांनी लाथा बुक्या आणि काठ्यांनी करण्यात आल्याचा आरोप या महिला सरपंचाने केला आहे. महिला सरपंच यांच्या सह पती, सासू, नणंद गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारसाठी टेभूर्णी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच टेभूर्णी पोलीस रुग्णालयात दाखल झाले असून या प्रकरणी अधिक तपास करत आहे. 

नक्की वाचा - पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्यात होणार खडाजंगी? आमने-सामने मुकाबल्यासाठी काँग्रेस तयार

भाजपच्याच माजी सरपंच आणि आजी सरपंच यांच्यात लोकसभा निवडणुकीत मतदानावरून झालेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक पातळीवर भाजपात सुरू असलेल्या गटबाजीचे राजकारण या घटनेमुळे समोर आले आहे. या प्रकरणी दोन्ही गटाने पोलिसात धाव घेत एकमेकांच्या विरुद्ध आरोप करत अर्ज दाखल केले आहेत. यावर पोलीस काय कारवाई करतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Advertisement