Navi Mumbai: सासूने जावयाला हाताशी धरलं, ड्रग्जचा बाजार मांडला, छाप्यात घबाड सापडलं

या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
नवी मुंबई:

राहुल कांबळे

नवी मुंबईतील दिघा येथील ईश्वर नगर परिसरात एक धक्कादायक कारवाई करण्यात आली आहे. रबाळे एमआयडीसी पोलिसांनी तब्बल 75 लाख रुपयांच्या किंमतीची 252 ग्रॅम ‘एमडी' (मेथेड्रोन) अमली पदार्थाची पावडर जप्त केली आहे. ही कारवाई शनिवारी सकाळी करण्यात आली. पोलिसांनी या छाप्यात चार जणांना अटक केली असून दोन जण फरार आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, दिघा ईश्वर नगर भागात शांताबाई नावाची महिला आणि तिचा जावई रोशन बसन्ना नाईक हे एमडी पावडरची विक्री करत असल्याचे समोर आले. त्यांच्या विरोधात यापूर्वीही NDPS कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिसांनी गंभीर दखल घेत शनिवारी सकाळी साडे सात वाजता सापळा रचला.

सकाळी 8 वाजता 3 पोलीस अधिकारी आणि 20 पुरुष व महिला अंमलदारांच्या पथकाने दिलेल्या पत्त्यावर धाड टाकली. त्या ठिकाणी एमडी पावडरचे छोटे पाकीट तयार करण्यासाठी वापरले जाणारे वजनकाटा, सुमारे 250 प्लॅस्टिकच्या रिकाम्या पिशव्या आढळून आल्या. मुख्यतः हे साहित्य अमली पदार्थाचे पॅकेट्स बनवण्यासाठी वापरले जात होते. या कारवाईत पोलिसांनी  चार जणांना अटक केली आहे.त्यात निलेश बसन्ना नाईक, शैलेश बसन्ना नाईक, उषा रोशन नाईक आणि ज्योती निलेश नाईक यांना अटक करण्यात आली आहे.  हे सर्व आरोपी ऐरोली, नवी मुंबई येथे वास्तव्यास आहेत. पोलिसांनी त्यांच्या घरातूनच ही संपूर्ण कारवाई केली. घरात एमडी पावडरचा साठा व्यवस्थितपणे लपवून ठेवण्यात आलेला होता.

नक्की वाचा - CIDCO News: माझ्या पसंतीचे सिडकोचे घर घेणाऱ्यांसाठी खुश खबर! घरांची किंमत 25 ते 30 टक्कांनी कमी होणार?

या कारवाईदरम्यान रोशन बसन्ना नाईक व शांताबाई हे दोघे फरार झाले आहेत.  पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे शांताबाई हीच मुख्य सूत्रधार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ती आणि तिचा जावई मिळून काही महिन्यांपासून या परिसरात एमडी विक्रीचे जाळे पसरवत होते. हे सर्व  आरोपी हे व्यवस्थित गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले, पुन्हा पुन्हा NDPS कायद्यात अडकलेले व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.

नक्की वाचा - Ujjwal Nikam: वकील ते खासदार! उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड नेमकी का झाली? 'ही' आहेत कारणं

या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी जप्त केलेली MD पावडर न्यायालयात सादर केली असून फॉरेन्सिक तपासणीसाठी ती प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक (गुन्हे) यांनी सांगितले की, “या प्रकरणात आणखी काही लोक सामील असल्याचा संशय आहे. शांताबाई आणि रोशन हे फरार असून त्यांचा लवकरात लवकर शोध घेतला जाईल. आम्ही आरोपींच्या नेटवर्कचा शोध घेत आहोत. असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. ही कारवाई नवी मुंबईतील अमली पदार्थ विक्रेत्यांच्या विरोधात पोलिसांनी पुकारलेला निर्णायक लढा मानली जात आहे. दिघा परिसरातील नागरिकांनी दिलेल्या गुप्त माहितीनंतर पोलिसांनी वेळेत केलेली धाड आणि कारवाईमुळे एक मोठे रॅकेट उघडकीस आले आहे.

Advertisement