
जुई जाधव
लोकसभा निवडणुकीत भाजप कडून एक नामांकित चेहरा मैदानात उतरवला गेला. तो चेहरा होता सरकारी वकील उज्वल निकम यांचा. उज्वल निकम हे एक नामांकीत सरकारी वकील आहेत. त्यांनी 1993 चा बॉम्ब स्फोट घटला असो की अजमल कसाबला फासावर लटकवण्याची केस असो सरकारची बाजू खंबीर पणे मांडली. आरोपींनी कठोर शिक्षा मिळवून दिली. कोर्ट रुमनंतर त्यांनी लोकसभेला आपलं नशिब अजमावून पाहीलं. पण त्यांना मोठा पराभव झाला. त्यांचे लोकसभेत जाण्याचे स्वप्न हुकले. मात्र एकदा हुकलेली संधी पुन्हा एकदा उज्वल निकम यांना देण्यात आली आहे.
2024 लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजन यांचं तिकीट कापून प्रख्यात वकील उज्वल निकम यांना भाजपनं उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांचे आव्हान होते. या निवडणुकीत वर्षा गायकवाड यांनी उज्ज्वल निकम यांनी चारीमुंड्या चित केलं. राजकारणाच्या कोर्टात निकम यांना पराभव स्विकारावा लागाल. त्यानंतर उज्वल निकम मी कुठल्याही पक्षाशी निगडित नाही असं वारंवार सांगत राहीले. त्यानंतर सरकारकडून बीड मधला संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांची सरकारने नियुक्ती केली.
आता त्यांना खासदार राज्यसभेत काम करण्याची संधी मिळाली आहे. राष्ट्रपती कोट्यातून ही नियुक्ती करण्यात आली आहे. उज्ज्वल निकम यांच्याबरोबरच भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, शिक्षणतज्ज्ञ सी सदानंदन मास्ते, शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांचीही राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विशेष आभार मानले.
उज्वल निकम हे एक प्राख्यात वकील आहेत. सरकारी वकील म्हणून त्यांनी अनेक खटले देखील लढले आहेत. शिवाय अनेक खटल्यात त्यांनी आरोपींना फाशीपर्यंत पोहोचवले आहे. सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील लोकांना राष्ट्रपती निर्देशित खासदारपदी वर्णी लावली जाते. या कॅटेगिरी मध्ये उज्ज्वल निकम बसत असल्याने त्यांची निवड झाल्याची चर्चा आहे. वकिली करत असताना जनतेशी जुळलेली त्यांची नाळ आणि एक बहुजन चेहरा म्हणून देखील त्यांच्या नावाची वर्णी लागली असल्याची चर्चा आहे. निकम यांना पद्मश्री देखील 2016 मध्ये बहाल करण्यात आला होता.
नक्की वाचा - Political news: 'कोण एकनाथ खडसे? त्यांना तर...', गिरीश महाजन पुन्हा नाथाभाऊंना भिडले
दरम्यान त्यांच्या या नियुक्तीवर त्यांच्या विरोधकांनी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पण टीका करण्याची संधी ही सोडलेली नाही. निकम यांच्या नावाची वर्णी तर आता खासदार म्हणून लागणार आहे. वकीली पेशा तर त्यांचा सगळ्यांनी पाहिला आहे. मात्र आता खासदार म्हणून ते नेमकं लोकांच्या न्याय हक्कासाठी कसं सभागृहात काम करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निकम हे विशेष सरकारी वकील म्हणून ही काम बजावत आहे. सध्या त्यांच्याकडे संतोष देशमुख खून खटला आहे. आता खासदार झाल्यानंतर त्यांना या केसवर काम करता येणार आहे की नाही याबाबतही उत्सुकता आहे.शिवाय खासदार आणि वकील अशा दुहेरी भूमीकेत ते कसं काम करतात हे ही पहावं लागणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world