महिला आणि लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशीच एक धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन इथं घडली आहे. इथं एका सात वर्षाच्या चिमुरडीला बेदम मारहाण करण्यात आली. एवढचं नाही तर तिचा रुमालाने गळा आवळण्यात आला. त्यानंतर तिला एका खड्ड्यातही टाकण्यात आलं. हा प्रकार ज्या व्यक्तीने केला त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर त्या चिमुकलीला उपचारासाठी पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ज्या चिमुकलीला मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न केला, ती मुलगी आणि आरोपी हे एकाच समाजातले आहेत. ते दोघेही एकमेकाला ओळखत होते. आरोपीला पत्नी असून त्याला दोन मुलं आहे. त्यांच्या बरोबर ही मुलगी नेहमी खेळत असे. खेळण्यासाठी म्हणून ही मुलगी त्या आरोपीच्या घरी गेली होती. पण त्याची बायको आणि मुली बाहेरगावी गेले होते. त्यावेळीच या आरोपीने मुलीला जबर मारहाण केली. तिचा गळा रूमालाने आवळला. पुढे त्याने त्या चिमुकलीला एका खड्ड्यात टाकून दिले. त्यानंतर त्याने तिथून पळ काढला.
उरुळी कांचन जवळ असणाऱ्या नायगावमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. मुलीला खड्ड्यात टाकून आरोपी सुखदेव जग्गनाथ याने पळ काढला. मुलगी थोड्या वेळाने स्वत:ला सावरत खड्ड्या बाहेर आली. तिने आपले घर गाठले. घरी गेली त्यावेळी ती पुर्ण चिखलात माखली होती. ती प्रचंड घाबरली होती. तिने झालेला सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर तिला कुंजीरवाडीतील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आलं. मात्र पुढील उपचारासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात हलवण्यात आलं.
ट्रेंडिंग बातमी - नोकरीसाठी दुबईला गेली पण थेट पाकिस्तानात पोहोचली, तब्बल 23 वर्षानंतर जे घडलं ते...
दरम्यान याबाबतची तक्रार पिडीत मुलीच्या पालकांनी पोलिसात केली आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याची चौकशी सध्या सुरू आहे. त्याने असे का केले. त्या मागे त्याचा काय उद्देश होता याचा तपास पोलिस करत आहेत. शिवाय त्या चिमुकलीवर अत्याचार झाले आहेत की नाहीत याचा ही तपास पोलिस करत आहेत. त्यानुसार तिची मेडीकल केली जाणार आहे असंही पुणे ग्रामीणचे पोलिस अधिकारी बाबुराव दडस यांनी सांगितले.