सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगले येथे चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. संशयिताने खुणा नंतर मृतदेह विद्युत पंपाच्या पेटीत घालून ठेवल्याचे समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली. प्राजक्ता मंगेश कांबळे वय 28 असे मृत महिलेचे नाव आहे. तर खून केल्यानंतर संशयित पती मंगेश चंद्रकांत कांबळे हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मंगेश आणि प्राजक्ताचा आठ वर्षांपूर्वी आंतरजातीय प्रेम विवाह झाला आहे. आरोपी मंगेशचा भाऊ निलेश आणि त्याची आई गेल्या पंधरा वर्षापासून मांगले येथे वास्तव्यास आहेत. मांगले वारणानगर रस्त्यावर ज्योतिबा मंदिरासमोर रामचंद्र वाघ यांच्या घरात ते भाड्याने राहतात. चार दिवसापूर्वी मंगेश त्यांची पत्नी प्राजक्ता, सहा वर्षाचा मुलगा शिवम, तीन वर्षाची मुलगी शिवन्या मुंबईहून आई आणि भावाकडे राहायला आले होते.
काल सकाळी भाऊ निलेश आणि तिची आई देववाडीला गेले होते. त्याच वेळी सकाळी दहाच्या दरम्यान पती-पत्नीचा वाद झाला होता. तो वाद विकोपाला जाऊन मंगेशने प्राजक्ताचा ओढणीने गळा अवळून खून केला. त्यानंतर बाजूच्या खोलीत ठेवलेल्या विद्युत पंपाच्या मोडक्या पेटीत हात पाय दुमडून मृतदेह झाकून ठेवला. खोलीला बाहेरून कुलूप घालून भावाला फोन केला. मी शिराळ्याला जाणार आहे. गाडी घेऊन ये असा निरोप दिला.
भाऊ घरी आला. तो गाडी घेऊन मंगेशकडे गेला. मंगेशचा सहा वर्षाचा मुलगा शिवम दारातच रडत होता. त्यावेळी निलेशने त्याला समजावून काय झाले, असे विचारले. त्यावेळी सहा वर्षाच्या शिवमने मम्मी पप्पाचे भांडण झाले आहे असे सांगितले. शिवाय पप्पांनी आईला मारून खोलीत ठेवल्याचे सांगितले. हे ऐकून त्याला धक्काच बसला. त्याने जावून पाहील्यानंतर हा सर्व हा प्रकार उघडकीस आला.
इकडे आरोपी मंगेश त्याच्या नातेवाईकांसोबत शिराळा पोलीस स्टेशनला हजर झाला. त्याने पत्नी बरोबर भांडण झाल्याचे सांगितले. त्यावेळी आपण पत्नीचा गळा आवळून खून केल्याचे कबूल केले. शिवाय तिचा मृतदेह घरातच पेटीत ठेवल्याचे ही सांगितलं. त्यानंतर मुलीच्या आईने तक्रार दिली. त्यानुसार आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील चौकशी पोलीस करत आहेत. या मागे आणखी काही कारण आहे का याचाही शोध घेत आहे. प्रथमदर्शनी पत्नीवर मंगेश संशय घेत होता हे समोर आले आहे.