देवा राखुंडे
दौंड तालुक्याच्या भुलेश्वर घाटात अर्धवट जळलेल्या अवस्थेत अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. 27 जून रोजी यवत पोलीस स्टेशन हद्दीत भुलेश्वर घाट परिसरात हा मृतदेह आढळून आला आहे. या मृत इसमाच्या डोक्यावर, छातीवर व पाठीवर धारदार आणि तीव्र हत्याराने वार झाल्याचे यवत पोलिसांनी सांगितले आहे. हा इसम कोण याचा शोध आता पोलिस घेत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अंदाजे 30 ते 35 वर्षे वयाचा पुरुषाचा हा मृतदेह आहे. यवत-भुलेश्वर रोडपासून सुमारे 100 मीटर अंतरावर, शेरू रिसॉर्टकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याजवळ हा मृतदेह आढळून आला. याची माहिती मिळताच यवत पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. घटनास्थळी काही पुरावे मिळतात का? याची ही चाचपणी पोलिसांनी केली. सध्या तरी पोलिसांच्या हाती काही ठोस पुरावा मिळालेला नाही. त्यामुळे या हत्येचे गुढ वाढले आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार सदरच्या मृत व्यक्तीच्या डोक्यावर छातीवर व पाठीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत. या शिवाय हा मृतदेह पेटवून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून यवत पोलीस अधिक तपास करत आहेत. त्यामुळे या व्यक्तीची ओळखव पटण्याचे मोठे आव्हान पोलिसां समोर आहे. शिवाय हत्या कुणी केली हे ही पोलिसांना शोधावे लागणार आहे.