सिगारेट दिली नाही म्हणून चार ते पाच जणांनी हॉटेल कामगारांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्री 2 वाजताच्या सुमारास शिरपूर जवळील शिमला हॉटेल येथे ही घटना घडली. या मारहाणीत हॉटेल चालक गंभीर जखमी झाला आहे. ग्राहकांनी केलेला हा संपूर्ण हंगामा सीसीटीव्हीत कैद झाला आहे.या व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. ज्या लोकांनी ही हाणामार केली त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आता हॉटेल चालक करत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील शिरपूरजवळ असलेल्या शिमला हॉटेलवर कामगार हमजाभाई रहिम नेदरीया हे होते. त्यावेळी रात्री 2 वाजताच्या सुमारास योगेश सोनार आणि त्याचे इतर तीन मित्र हॉटेलवर आले होते. त्यांनी हमजाभाई नेदरीया यांच्याकडे सिगारेट मागितली. यावर हॉटेल बंद असल्याने सिगारेट मिळणार नाही असं त्यांनी सांगितलं. त्याचा राग योगेश सोनार आणि त्याच्या मित्रांना आला. त्या रागातून त्यांनी थेट हमजाभाई नेदरीया यांना मारहाण करण्यास सुरूवात केली.
मारहाण करताना हमजाभाई त्यांच्या खिशात असलेली 6 हजाराची रोकडही त्यांनी हिसकावून घेतली. या मारहाणीत हमजाभाई नेदरीया यांना जबर मार लागला आहे. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. या प्रकरणी शिरपूर शहर पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावेळी झालेल्या या मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ ही व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिस आरोपींचा शोध या सीसीटीव्हीच्या माध्यमातून घेत आहेत.
सिगारेट दिली जात नाही या शुल्लक कारणावरून हा वाद झाला. त्यामुळे परिसरातही खळबळ उडाली आहे. शिवाय हायवे शेजारी असलेल्या हॉटेल चालक मालकांतही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्राहक कोणत्या वेळी काय मागणी करेल आणि त्यानंतर ते काय करतील याचा नेम नाही. त्यामुळे हॉटेल मालकांनीही धास्ती घेतली आहे. अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त केला पाहीजे अशी मागणी आता होत आहे.