राहुल कांबळे
नवी मुंबईतील ऐरोली परिसरात राहणाऱ्या एका 46 वर्षीय महिलेला परदेशातून महागडे गिफ्ट पाठवत असल्याचे सांगून सायबर ठगांनी तब्बल 49.59 लाखांची फसवणूक केली आहे. ही फसवणूक जून 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत करण्यात आली आहे. याप्रकरणी महिलेने रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेला सोशल मीडियावर एका परदेशी व्यक्तीचा फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. त्या व्यक्तीने स्वत:ला इंग्लंडमध्ये राहणारा व्यावसायिक असल्याचे सांगितले होते. काही दिवसांनंतर त्याने महिलेशी चांगली मैत्री केली. तिचा विश्वास संपादीत केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
त्यानंतर त्याने तिला सांगितले की तुला मला काही गिफ्ट पाठवायचे आहे. सोन्याचे दागिने,आयफोन आणि परदेशी चलन असल्याचे सांगितले. काही दिवसांनी महिलेला एका कस्टम अधिकाऱ्याचा फोन आला. त्याने सांगितले की, परदेशातून आलेल्या गिफ्टमध्ये जास्त किंमतीच्या वस्तू आणि विदेशी चलन आहे. त्या पार्सलवर तुम्हाला भरपूर कर आणि दंड भरावा लागेल. त्यासाठी महिलेला टप्प्याटप्प्याने 49.59 लाख रुपये विविध बँक खात्यांमध्ये ऑनलाइन ट्रान्सफर करायला लावण्यात आले. सुरुवातीला तिला सांगण्यात आले की हे पैसे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर परत दिले जातील. मात्र, पुढे त्या परदेशी व्यक्तीने आणि कथित कस्टम अधिकाऱ्याने तिच्या बरोबरचा संपर्क तोडला. संशय आल्यावर पीडित महिलेने अखेर पोलिसांकडे धाव घेतली.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे की, ही फसवणूक एखाद्या आंतरराष्ट्रीय सायबर टोळीने केली आहे. आरोपींनी बनावट कस्टम अधिकारी बनून महिलेला सातत्याने फोन करून विश्वास संपादन केला. त्यानंतर तिच्याकडून पैसे उकळले. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबई सायबर गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या मदतीने अधिक तपास केला जात आहे. सायबर गुन्हेगार अशाप्रकारे सोशल मीडियावरून किंवा व्हॉट्सअॅप, इमेलवरून लोकांचा विश्वास संपादन करतात. ‘गिफ्ट' किंवा ‘लॉटरी'च्या आमिषाने फसवणूक करतात. नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या गिफ्ट्सवर विश्वास ठेवू नये, तसेच कोणत्याही शासकीय व्यवहारासाठी वैयक्तिक खात्यात पैसे भरण्याची मागणी आली, तर त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. असे आवाहन पोलिसांनी केले आहे.