Akola News: 48 लाखांचा डिजिटल दणका! डॉलरच्या बदल्यात बड्या व्यापाऱ्याला गंडा, अकोल्यातील धक्कादायक प्रकार

Akola News : अकोल्यातील एका व्यापाऱ्याला ऑनलाईन व्यवहाराच्या जाळ्यात ओढून त्याची मोठी फसवणूक करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Akola News : या फसवणुकीची पाळेमुळे बंगळुरूपर्यंत पोहोचली आहेत.
अकोला:

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

Akola News : अकोल्यातील एका व्यापाऱ्याला ऑनलाईन व्यवहाराच्या जाळ्यात ओढून तब्बल 48 लाख 82 हजार 600 रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. परदेशी चलन मिळवून देण्याचे आणि भारतीय रुपयांचे अमेरिकन डॉलरमध्ये कायदेशीररीत्या रूपांतर करण्याचे आमीष दाखवून ही फसवणूक करण्यात आली. 

अकोल्याच्या एमआयडीसी परिसरातील लक्ष्मी नारायण दाल मिलचे मालक रोहन अशोक बियाणी यांनी या प्रकरणी पोलिसांत धाव घेतली असून, या मोठ्या आर्थिक गुन्ह्यामुळे शहरात खळबळ माजली आहे.

व्यवसायानिमित्त झालेल्या ओळखीचा गैरफायदा

या फसवणुकीची पाळेमुळे बंगळुरूपर्यंत पोहोचली आहेत. जुलै 2025 मध्ये रोहन बियाणी हे काही व्यावसायिक कामासाठी बंगळुरू येथे गेले होते. तिथे त्यांची ओळख नेहा जैन आणि राघव देसाई नावाच्या दोन व्यक्तींशी झाली. या दोघांनीही स्वतःला परदेशी चलन व्यवहारातील (फॉरेक्स ट्रेडींग) तज्ज्ञ म्हणून सादर केले. 

बियाणी यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने संवाद साधला आणि आपण कशा प्रकारे कायदेशीर मार्गाने डॉलर उपलब्ध करून देऊ शकतो, याचे आमिष त्यांना दाखवले.

Advertisement

( नक्की वाचा : Dombivli News: माझ्या खात्यात 2 कोटी 60 लाख आले कुठून? तरुणीच्या प्रश्नानं डोंबिवलीत खळबळ, वाचा काय आहे प्रकरण )

वेबसाईट आणि बनावट वॉलेटचा वापर

बियाणी यांना ऑस्ट्रेलियातून कडधान्य आयात करण्यासाठी डॉलरमध्ये पेमेंट करायचे होते, त्यामुळे त्यांना या ऑफरमध्ये रस वाटला. आरोपींनी त्यांना र्योचेन डॉट नेट ([https://ryochain.net](https://ryochain.net)) नावाच्या एका वेबसाईटवर खाते उघडण्यास भाग पाडले. 

आरोपींच्या सांगण्यानुसार, 25 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2025 या कालावधीत बियाणी यांनी युपीआय आणि आरटीजीएसच्या माध्यमातून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण 48 लाख 82 हजार 600 रुपये जमा केले. सुरुवातीला त्या वेबसाईटवरील वॉलेटमध्ये डॉलरची रक्कम वाढताना दिसत होती, त्यामुळे बियाणी यांना हा सर्व व्यवहार खरा वाटत होता.

Advertisement

( नक्की वाचा : Nalasopara News: नालासोपाऱ्यात मध्यरात्री थरार! बायकोसमोरच नवऱ्यावर चाकूने वार, 'तो' फोटो ठरला निमित्त )

मोठ्या रकमेची मागणी आणि संपर्क बंद

मात्र, 12 डिसेंबर 2025 रोजी जेव्हा बियाणी यांनी आपल्या खात्यात लॉगिन करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना त्यांचे खाते बंद झाल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने नेहा जैन आणि राघव देसाई यांच्याशी संपर्क साधला, परंतु आरोपींनी पैसे देण्याऐवजी उलट आणखी 50 लाख रुपये भरण्याची मागणी केली. 

बियाणी यांनी त्यांचे पूर्वीचे पैसे परत मागितले, तेव्हा आरोपींनी आपले मोबाईल फोन बंद करून सर्व संपर्क तोडून टाकला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी अकोल्याच्या खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Advertisement

पोलिसांचा तपास आणि खबरदारीचे आवाहन

खदान पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 316(2), 318(4), 3(5) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66(ड) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक मनोज केदारे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. डिजिटल युगात अशा प्रकारच्या वेबसाईटवर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत यंत्रणांकडून शहानिशा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. अनोळखी व्यक्तींनी दिलेल्या लिंकवर पैसे गुंतवताना सावध राहणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
 

Topics mentioned in this article