जाहिरात

Nalasopara News: नालासोपाऱ्यात मध्यरात्री थरार! बायकोसमोरच नवऱ्यावर चाकूने वार, 'तो' फोटो ठरला निमित्त

Nalasopara News: सोशल मीडियावरील एका छोट्याशा वादाचे पर्यवसान थेट हत्येत झाल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यात घडली आहे.

Nalasopara News: नालासोपाऱ्यात मध्यरात्री थरार! बायकोसमोरच नवऱ्यावर चाकूने वार, 'तो' फोटो ठरला निमित्त
Nalasopara News: सुरुवातीला किरकोळ वाटणारा हा वाद हळूहळू चिघळत गेला
नालासोपारा:

Nalasopara News: सोशल मीडियावरील एका छोट्याशा वादाचे पर्यवसान थेट हत्येत झाल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. व्हॉट्सअ‍ॅप डीपीवरून सुरू झालेला वाद इतका विकोपाला गेला की, एका 24 वर्षांच्या तरुणाची त्याच्या पत्नीसमोरच चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. नालासोपारा पश्चिम येथील हनुमान नगर परिसरात पहाटे 4.30 च्या सुमारास हा थरार घडला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. आफताब शेख असे मृत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी पोलिसांनी मेहंदी हसन शेख या 25 वर्षांच्या आरोपीला ताब्यात घेतले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप डीपी बनला वादाचे कारण

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या हत्येमागे व्हॉट्सअ‍ॅपचा डिस्प्ले फोटो म्हणजेच डीपी कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. आरोपीच्या मुलाचा फोटो मृत आफताबच्या पत्नीने आपल्या व्हॉट्सअ‍ॅप डीपीवर ठेवला होता. याच कारणावरून आरोपी आणि आफताब यांच्यात वाद सुरू झाला. 

सुरुवातीला किरकोळ वाटणारा हा वाद हळूहळू चिघळत गेला आणि त्याचे रूपांतर थेट रक्तरंजित संघर्षात झाले. दोन पुरुष आणि तीन महिलांनी मिळून आफताबवर चाकूने सपासप वार केले, असा खळबळजनक आरोप आफताबच्या पत्नीने केला आहे.

( नक्की वाचा : Dombivli News: माझ्या खात्यात 2 कोटी 60 लाख आले कुठून? तरुणीच्या प्रश्नानं डोंबिवलीत खळबळ, वाचा काय आहे प्रकरण )

बायकोसमोरच नवऱ्याची हत्या

पहाटेच्या सुमारास जेव्हा सर्वजण गाढ झोपेत होते, तेव्हा हा जीवघेणा हल्ला करण्यात आला. आपल्या पतीवर डोळ्यांदेखत वार होताना पाहून पत्नीने आरडाओरडा केला, मात्र हल्लेखोरांनी आफताबला रक्ताच्या थारोळ्यात पाडले. 

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मुख्य आरोपी मेहंदी हसन शेख याला ताब्यात घेतले. आरोपीदेखील विवाहित असल्याची माहिती समोर आली असून पोलीस आता या प्रकरणातील इतर संशयितांचा शोध घेत आहेत.

( नक्की वाचा : Bhigwan kidnapping case: प्रेमाचा दावा फोल? पाचच दिवसांत तरुणीनं बदलला निर्णय; भिगवण प्रकरणाला अनपेक्षित वळण )

आरोपीवर स्थानिकांचे गंभीर आरोप

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये मोठा रोष पाहायला मिळत आहे. आरोपी मेहंदी हसन शेख हा मूळचा बांगलादेशी नागरिक असल्याचा दावा काही स्थानिकांनी केला आहे. इतकेच नव्हे तर, तो यापूर्वीही पोक्सो (POCSO) सारख्या गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगून बाहेर आल्याची चर्चा परिसरात आहे. मात्र, या आरोपांबाबत पोलिसांनी अद्याप अधिकृतपणे कोणताही दुजोरा दिलेला नाही. पोलीस सध्या आरोपीच्या कागदपत्रांची आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीची सखोल चौकशी करत आहेत.

नालासोपाऱ्यातील वाढती गुन्हेगारी

नालासोपाऱ्यात सलग घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. किरकोळ कारणावरून थेट हत्या करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेल्याने कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या हत्येमुळे हनुमान नगर परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस खबरदारी म्हणून अधिक तपास करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com