Delhi Crime: दिल्लीतील एका फोन चोरी प्रकरणामुळे एक धक्कादायक खुलासा झाला आहे. दिल्लीतील एका व्यक्तीचा फोन स्कुटीवरुन आलेल्या दोन व्यक्तींनी हिसकावून घेतला होता. परंतू नंतर चोरीचा हा कट त्याच्या पत्नीनंच रचला होता, हे तपासात उघड झालं आहे. पत्नीनं हे का केलं याचं कारणही पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांना लावलं कामाला
दक्षिण दिल्लीमधील पोलीस स्टेशनमध्ये त्या व्यक्तीनं फोन चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. पोिलसांनी या प्रकरणाचा तपास करताना त्या भागातील 70 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यावेळी पत्नीनं तिचे रहस्य लपवण्यासाठी ही चोरी घडवून आणल्याचे तपासामध्ये स्पष्ट झाले.
दक्षिण दिल्लीचे उपायुक्त (डीसीपी) अंकित चौहान यांच्या माहितीनुसार, 19 जून रोजी पोलिसांना ओल्ड यूके पेंट फॅक्टरीजवळ एका व्यक्तीचा फोन हिसकावून घेतल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
पोलिसांनी परिसरातील 70 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासले. पोलिसांनी स्कुटीचा नोंदणी क्रमांकही शोधला. ती स्कूटी दरयागंज भागातून एक दिवसांसाठी भाड्यानं घेण्यात आली होती.
( नक्की वाचा : Love Story : प्रेमी जोडप्याला जनावरांसारखी वागणूक, नांगराला जुंपून शेतात नांगरणी, पाहा Video )
स्कुटी भाड्याने घेणाऱ्या व्यक्तीच्या आधार कार्ड आणि मोबाईल नंबरवरून पथक राजस्थानमधील बाड़मेर जिल्ह्यातील बालोत्रा येथे पोहोचले. त्यांनी आरोपींपैकी एक असलेल्या अंकित गेहलोतला अटक केली. या आरोपीच्या जबानीतून चोरीचा हेतू उघड झाला.
पत्नीनं का रचला कट?
अंकितने सांगितले की, त्याला पीडितेच्या पत्नीने कामावर ठेवले होते, जिचे दुसऱ्या व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध होते. अंकितच्या माहितीनुसार, महिलेचे प्रियकरासोबतचे खाजगी फोटो तिच्या पतीच्या फोनमध्ये सेव्ह होते. ते फोटो डिलीट करायचे असल्याने तिने ही चोरी घडवून आणली. तिने अंकितला तिच्ा पतीच्या दैनंदिन दिनचर्येची, ऑफिसच्या वेळा आणि मार्गाची माहिती दिली होती.
पोलिसांनी अंकितकडून चोरीला गेलेला मोबाईल फोन जप्त केला असून, अंकित आणि पीडितेची पत्नी या दोघांनाही अटक केली आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार, पीडित व्यक्तीला आपल्या पत्नीच्या प्रेमसंबंधांबद्दल माहिती होती. ती झोपलेली असताना त्याने ते फोटो आपल्या फोनमध्ये ट्रान्सफर केले होते. जेव्हा महिलेला याची माहिती मिळाली, त्यावेळी तिला आपल्या कुटुंबासमोर हे उघड होण्याची भीती वाटली. त्यानंतर तिने हा सर्व कट रचला.