तुम्हीही ऑनलाइन वस्तू मागवता? एकट्या मुलीसोबत घडलं घृणास्पद कृत्य, डिलिव्हरी बॉय थेट घरात शिरला अन्..

बंगळुरूतील एका धक्कादायक घटनेनं ऑनलाइन डिलिव्हरी सेवांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins

Bengaluru News : तुम्ही खाद्य पदार्थांपासून कपड्या लत्त्यापर्यंत सगळं काही ऑनलाईन मागवता. मात्र बंगळुरूतील घडलेल्या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बंगळुरूतील एका धक्कादायक घटनेनं ऑनलाइन डिलिव्हरी सेवांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. एका तरुणीने फ्लिपकार्टच्या डिलिव्हरी बॉयविरोधात  तिच्या घरात बळजबरीने प्रवेश करून अश्लील वर्तन केल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडियावर ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. पण या प्रकरणानंतर महिलांची सुरक्षा, ग्राहकांचा विश्वास आणि ई-कॉमर्स कंपन्यांच्या जबाबदारीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. 

ऑनलाईन शॉपिंग आता जवळपास प्रत्येकाच्या घरातला एक भाग बनला आहे. किराणा सामान, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपासून अगदी दैनंदिन गरजांच्या गोष्टीही घरपोच मिळत असतील तर अशी शॉपिंग कुणाला नकोय. पण ज्या डिलिव्हरी एजंटवर ग्राहक विश्वास ठेवतात, त्याच व्यक्तीकडून असुरक्षिततेची भावना निर्माण झाली तर? हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे बंगळुरुत घडलेली ही धक्कादायक घटना.

Advertisement

बंगळुरुत तरुणीबाबत नेमकं काय घडलं? 

फिल्पकार्टचा डिलिव्हरी एजंट पार्सल देण्यासाठी एका 27 वर्षीय तरुणीच्या घरी आला होता. तरुणीकडे पार्सल दिल्यानंतर त्याने घरातील वॉशरुम वापरण्याची परवानगी मागितली. घरात एकटी राहत असल्यानं आणि अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश चुकीचा वाटल्यानं तरुणीनं त्याला स्पष्ट नकार दिला. इतकंच नाही तर बाजूलाच काही पुरुष मंडळी राहतात, त्यांच्याकडे जाण्याचा सल्लाही तिने दिला. पण डिलिव्हरी बॉय तिचा नकार असतानाही घरात शिरला. चपला काढून तो थेट वॉशरुममध्ये गेला. त्यावेळी आपण प्रचंड घाबरलो होतो. सुरक्षेसाठी मोबाईल कॅमेरा सुरु ठेवला. मुख्य दरवाजा उघडा ठेवला आणि वेळप्रसंगी बाहेर पळता यावं म्हणून दरवाजाजवळच उभी राहिल्याचं तरुणीने सांगितलं. वॉशरुममधून बाहेर आल्यानंतर डिलिव्हरी बॉयने गुप्तांग दाखवत तरुणीसमोर अश्लील वर्तन केलं. तरुणीने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, पण तो तिथून पळून गेला

या सगळ्या प्रकारामुळे आपल्याला धक्का बसला. अपमानित आणि स्वत:च्याच घरात असुरक्षित वाटल्याचं तरुणीने म्हटलंय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. महिला वर्गात संतापाची लाट पसरलीय आणि कठोर कारवाईची मागणी होऊ लागली आहे.  परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन बंगळुरु पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आहे. इतकंच नाही तर डिलिव्हरी बॉयला अटक करुन त्याच्या विरोधात कलम 75, 79 आणि 329(2) अंतर्गत कारवाई सुरु केलीय. 

नक्की वाचा - 50 कोटी घेऊन फरार? सुट्टीसाठी परदेशात गेलेले आई-वडील परतलेच नाही; लेकीची पोलिसात धाव

दरम्यान, या घटनेनंतर फ्लिपकार्टने अधिकृत निवेदन जारी करत ग्राहकाला पूर्ण पाठिंबा असल्याचं नमूद केलं आहे. इतकंच नाही तर संबंधित डिलिव्हरी बॉयला कामावरुन काढून टाकल्याची माहितीही कंपनीने दिली आहे.  कंपनीच्या म्हणण्यानुसार, डिलिव्हरी पार्टनर्सची पार्श्वभूमी तपासणी आणि प्रशिक्षण प्रक्रिया आधीपासून अस्तित्वात आहे. मात्र, या घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्राहक सुरक्षा व्यवस्था आणखी सक्षम करता येईल का, याचाही आढावा घेतला जाणार आहे.

Advertisement

ही घटना केवळ एका तरुणीपुरती मर्यादित नाही. ऑनलाइन डिलिव्हरी सेवा वापरणाऱ्या लाखो ग्राहकांच्या मनात सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण करणारी आहे. विशेषतः एकट्या राहणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी अशा घटना चिंतेचा विषय ठरतायत. ऑनलाइन सेवा कितीही प्रगत झाल्या तरी ग्राहकांची सुरक्षा, विशेषतः महिलांची सुरक्षितता हीच सर्वात मोठी प्राथमिकता असली पाहिजे. अशा घटनांवर जलद कारवाई होणं जितकं आवश्यक आहे, तितकंच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी सुरक्षा यंत्रणा उभी करणंही गरजेचं आहे.