तीन महिला एक तरुण आणि एक थरारक हत्या. ही घटना घडली आहे धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरात. तीन महिलांनी संगणमत करून 23 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली असून पोलिसांनी तिन्ही महिलांना अटक केली आहे. हत्या झालेल्या 23 वर्षीय तरुणाचे नाव अभिषेक कालिदास शिंदे असे असून, या प्रकरणी मृच तरूणाचे वडील कालिदास शिंदे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 24 जुलैच्या रात्री घडला. उमरगा शहरातील बायपास रोडलगत आरती मंगल कार्यालयाच्या शेजारील शेतात अभिषेकचा मृतदेह आढळून आला. मृतदेह सापडताच परिसरात एकच खळबळ उडाली होती. हत्या करण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र वडिलांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान करत तिन्ही आरोपी महिलांना अटक केली आहे. सर्व पुरावे गोळा करून सखोल चौकशी सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच हत्येमागचे खरे कारण समोर येईल. आरोपी महिला सध्या येरमाळा येथील कालिका माता कला केंद्रात वास्तव्यास होत्या, असे पोलिसांनी सांगितले आहे.
तरुणाची हत्या प्रकरणातील आरोपी असलेल्या त्या तिन्ही महिला या चोराखळी येथील कालिका माता कला केंद्रात राहण्यास होत्या. गेल्या आठ दिवसापूर्वीच दोन तरुणांवर येथे जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. उमरगा येथील या 23 वर्षीय हत्या प्रकरणातील या महिला याच कला केंद्रात वास्तव्यास असल्याने पुन्हा एकदा हे कला केंद्र चर्चेचा केंद्रबिंदू बनले आहे.