ओंकार कुलकर्णी, प्रतिनिधी
Father Kills Daughter : प्रत्येक आई-वडिलांना त्यांची मुलं हे सर्वस्व असतात. आपल्या मुलांसाठी वाट्टेल ते कष्ट करण्याची, कोणताही त्रास सहन करण्याची त्यांची तयारी असते. पण, या काही घटना अशा घडतात की त्यामुळे या पवित्र नात्याला काळीमा फासला जातो. असाच एक धक्कादायक प्रकार धाराशिव जिल्ह्यात घडला आहे. येथील एका बापानं सैतानालाही लाजवेल असं कृत्य केलं. त्यानं त्याच्या अवघ्या नऊ वर्षांच्या चिमुकलीचा कुऱ्हाडीनं वार घालून हत्या केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील माणिकनगर शेळगाव येथे ही धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. ज्ञानेश्वर महादेव जाधव असं या निर्दयी बापाचं नाव आहे. त्याने नऊ वर्षाच्या मुलीवर कुऱ्हाडीनं वार केले आणि तिची हत्या केली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मृत मुलीचे नाव गौरी ज्ञानेश्वर जाधव असून ती सतत आजारी पडत होती. काही दिवसांपूर्वी ती सायकलवरून पडल्याने गंभीर जखमी झाली होती. या घटनेनंतर रागाच्या भरात, तसेच दारूच्या नशेत असलेल्या ज्ञानेश्वरने मुलीवर कुऱ्हाडीने वार केले. या मारहाणीमध्ये तिचा जागीच खून केला.
( नक्की वाचा : 'मी 18 एकरचा मालक... माझं लग्न होत नाही' प्रवचनात व्यथा मांडणाऱ्या व्यक्तीचा सापडला मृतदेह )
या चिमुरडीचा मृतदेह तब्बल 24 तास घरामध्येच पडून होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण गाव हादरून गेला. घटनेची माहिती मिळताच आंबी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी आरोपीला अटक केले.
या प्रकरणी आंबी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. जन्मदात्या बापानेच चिमुकलीचा जीव घेतल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. आरोपीला कठोर शिक्षा द्यावी,अशी मागणी स्थानिकांमधून करण्यात येत आहे.