
आपल्या देशात वेळेवर लग्न न होणं हा मोठा सामाजिक प्रश्न होत आहे. उपवर व्यक्तींची लग्न करण्यासाठी घालमेल वाढली की त्याचा फायदा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकं घेतात. असाच एक धक्कादायक प्रकार आता उघड झाला आहे. वधू न मिळाल्याने आलेल्या तीव्र निराशेपोटी एका 45 वर्षीय व्यक्तीने सार्वजनिक आवाहन केले होते. तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर एका महिलेनं तिची ओळख बदलून तिच्याशी लग्न केले. त्यानंतर त्याचा मृतदेह सापडला आहे.
काय आहे प्रकरण?
मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील पदवार (खितोला) गावातील इंद्रकुमार तिवारी, जे अर्धवेळ शिक्षक आणि शेतकरी होते, त्यांनी गेल्या महिन्यात प्रसिद्ध गुरु अनिरुद्धाचार्य महाराज यांच्या प्रवचनादरम्यान वधू न मिळाल्याबद्दल आपली निराशा व्यक्त केली होती.
व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, इंद्रकुमार गुरु अनिरुद्धाचार्यांना सांगितलं होतं की त्यांच्याकडे 18 एकर जमीन आहे पण त्यांची मालमत्ता सांभाळायला कोणी नाही. त्यावेळी सल्ल्याऐवजी इंद्रकुमार यांना हलक्याफुलक्या विनोदाला सामोरं जावं लागलं.
दुर्दैवाने, हा व्हिडिओ फसवणूक करणाऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर काही दिवसांमध्येत इंद्रकुमार बेपत्ता झाले. 6 जून रोजी त्यांचा मृतदेह गळयात चाकू खुपसलेल्या अवस्थेत उत्तर प्रदेशातल्या कुशीनगरमध्ये राष्ट्रीय महामार्ग 28 जवळ झुडपांमध्ये सापडला.
( नक्की वाचा : PUBG Game Addiction : नवऱ्याचे 55 तुकडे करण्याची धमकी, गेम खेळता-खेळता घर सोडून गेली पत्नी! )
साहिबा बानो झाली खुशी तिवारी!
कुशीनगरचे पोलीस अधीक्षक (SP) संतोष कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार साहिबा बानो नावाच्या महिलेने 'खुशी तिवारी' हे नाव धारण करुन सोशल मीडियाच्या माध्यमातून इंद्रकुमार यांच्याशी संपर्क साधला.
इंद्रकुमार आणि साहिबा यांची हळूहळू ओळख वाढत गेली, तेव्हा साहिबाने त्याला उत्तर प्रदेशातील गोरखपूरला बोलावले. 'खुशी तिवारीने इंद्रकुमारशी संपर्क साधला आणि त्याला लग्नाची मागणी घातली. त्याने तिच्याशी लग्न करण्यास होकार दिला. त्यानंतर त्या महिलेने तिच्या साथीदारांसह सापळा रचला,' असे कुमार म्हणाले.
पोलिसांनी सांगितले की, इंद्रकुमारने आपल्या कुटुंबियांना सांगितले होते की तो 'खुशी' शी लग्न करण्यासाठी कुशीनगरला जात आहे.
( नक्की वाचा : सोनमपेक्षाही भयंकर ऐश्वर्या ! आई-मुलीचा एकच प्रियकर, लग्नानंतर महिनाभरातच नवऱ्याचा केला राजा रघुवंशी ! )
इंद्रकुमार गोरखपूरला पोहोचला आणि दोघांनी लग्न केले. काही दिवसांनंतर त्याचा मृतदेह सापडला. खुशीनंच तिच्या साथीदारांसह इंद्रकुमारची हत्या केली, असा संशय असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
साहिबाला अटक करण्यात आली आहे. तिने बनावट आधार कार्ड देखील बनवले होते. उर्वरित आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world